नायरच्या दंत महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आत्महत्या


नायरच्या दंत महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आत्महत्या
SHARES

नायर रुग्णालयाच्या दंत महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने परळच्या वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. भाग्यलक्ष्मी गौतमचंद मुठा (20) या विद्यार्थिनीने मंगळवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. दंत महाविद्यालयाचा अभ्यास कठीण जात असल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. आत्महत्येपूर्वी तिने मित्राला ‘व्हॉट्स अॅाप’वर मेसेज करून आपण आयुष्य संपवणार असल्याची कल्पना दिली होती, असेही उघड झाले आहे.

मूळची कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील असलेली भाग्यश्री ही महापालिकेच्या नायर वैद्यकीय दंत महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत होती. पण, अभ्यासक्रम अवघड जात असल्याने गेल्या काही दिवसांपासून ती निराश होती. मंगळवारी महाविद्यालयात सर्व मुली जाण्यासाठी निघाल्या असताना भाग्यलक्ष्मीने तब्येत ठिक नसल्याचे कारण दिले आणि ती वसतीगृहातच थांबली. त्यानंतर तिने तिच्या रुममधील पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला.

पालकांनी शिक्षणासाठी मोठा खर्च केल्याने वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडल्यास घरच्यांची बेअब्रू होईल, अशी भीती तिला वाटत होती. त्यामुळे तिने आत्महत्येचे पाऊस उचलले असावे, अशीही माहिती मिळत आहे. मंगळवारी एक वाजेच्या सुमारास तिच्या खोलीतील मैत्रीण आली असता हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर भाग्यलक्ष्मीला परळच्या केईएम रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

पोलिसांना घटनास्थळी ‘सुसाईड नोट’ आढळली नाही. मात्र आत्महत्येच्या थोड्या वेळापूर्वी तिने ‘रेडिओलॉजी’ विभागात शिकत असलेल्या आपल्या मित्राला ‘व्हॉट्स अॅाप’वर त्याबाबत मेसेज केल्याचे आढळून आल्याचे काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप उगले यांनी सांगितले.


व्हॉट्स अॅपचा मेसेज ठरला शेवटचा

भाग्यलक्ष्मीने मित्राला पाठवलेल्या ‘व्हॉट्स अॅलप’ मेसेजमध्ये ‘बीडीएस’चे शिक्षण अवघड जात असून घरच्यांनी शिक्षणासाठी खूप खर्च केल्याने सोडू शकत नसल्याचे स्पष्टपणे लिहिले होते. यामुळे निराश असून जीवनाचा अंत करावासा वाटतो, मला सगळ्यांनी माफ करावे, असेही स्पष्ट केले होते. त्यावर मित्राने तिला मेसेज पाठवत समजवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मित्राच्या मेसेजकडे दुर्लक्ष करत भाग्यलक्ष्मीने आयुष्य संपवले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा