अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश


अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
SHARES

मुंबई - बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड या राज्यातील साधारण कुटुंबीयांना मोफत मुंबई दर्शन घडवण्याचे आमिष दाखवून त्यांच्या नकळत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतराज्यातील टोळीचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने केला आहे. यातील मुख्य आरोपी अशा प्रकारच्या मोडस ऑपरेंडीचा वापर करून गेली पाच वर्षे अंमली पदार्थ मुंबईत आणून विकत असल्याची माहिती पुढे आली आहे.

मुंबईतील अंमली पदार्थांचा तस्कर कुमार अहमद (40), टॅक्सीचालक मोहम्मद आरिफ (29), मुन्ना कुमार (34), मुकेश सिंग, पप्पू सिंग, त्याची पत्नी रिंकू सिंग आणि त्यांची 15 वर्षाची मुलगी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

आरामदायक सोयीसुविधांनी युक्त असलेल्या कारमधून मुंबईला मोफत फिरायला नेण्याचे आमिष यातील मास्टरमाइंड असलेला अहमद हा बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड या राज्यातील कुटुंबीयांना दाखवत असे. त्यांच्या आडून अहमद आणि त्यांचे साथीदार मुंबईला निघालेल्या कारमध्ये गांजासारखे अंमली पदार्थ लपवून मुंबईत आणून तस्करांना विकत असत. या मोडस ऑपरेंडीचा वापर गेल्या पाच वर्षांपासून अहमद करत होता. या त्याच्या नव्या कार्यपद्धतीचा पर्दाफाश अंमली पदार्थ विरोधी कक्षाने रविवारी केला.

मानखुर्द येथे त्यांच्या टुरिस्ट कारमधून मुंबईतील टॅक्सीत 110 किलो गांजा ठेवत असताना पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले. अधिक तपासात यातील मुख्य आरोपी अहमद याला तीन वर्षांपूर्वी अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या घाटकोपर युनिटने अटक केली होती. जामिनावर सुटल्यानंतर मुंबईत राहणाऱ्या अहमदने मोफत मुंबई दर्शन घडवण्याच्या आडून अंमली पदार्थांची तस्करी सुरू केली. अहमद आंध्र प्रदेश, ओरिसा आणि झारखंड येथून अंमली पदार्थ मागवत असे.

टुरिस्ट कारसाठी अहमद एका वेळेस 20 हजार रुपये खर्च करत असल्याची माहिती पुढे आली आहे. तर प्रवासादरम्यान त्याच्या कारची कोणत्याही पोलिसांकडून तपासणी केली जात नव्हती. आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी दिली असून अल्पवयीन मुलीला डोंगरीच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा