व्यावसायिक राज कुंद्राची ईडीकडून 9 तास चौकशी

कुंद्रा यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन इकबाल मिर्चीसोबत व्यावसायिक करार केल्याचा आरोप आहे.

SHARE


इकबाल मिर्चीच्या वादग्रस्त मालमत्ता प्रकरणी ईडीने (अंमलबजावणी सक्तवसुली संचालनालय) उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला समन्स बजावलं होता. 4 नोव्हेॆबर रोजी कुंद्रा यांना चौकशीला हजर राहण्यास बजावले होते. माञ त्यापूर्वीच कुंद्रा बुधवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. ईडीकडून तब्बल 9 तास राज यांची चौकशी करण्यात आली आहे. कुंद्रा यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन इकबाल मिर्चीसोबत व्यावसायिक करार केल्याचा आरोप आहे. मात्र, राज कुंद्रा यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

इकबाल मिर्चीचा साथीदार रंजीत सिंघब्रिंद्रासोबत एक व्यावसायिक करार केला होता. रंजित ब्रिंदा हा इकबाल मिर्चीसाठी काम करतो. आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या तपशिलांची पडताळणी करत असताना ईडीला राज कुंद्रा यांच्या संदर्भातील माहिती आढळली. कारण या पडताळणीत इसेन्शिअल हॉस्पिटॅलिटी लिमिटेड कंपनीचं नाव समोर आलं. ही कंपनी राज कुंद्रा यांच्या मालकीची आहे तर अभिनेत्री शिल्पा शेट्टी या कंपनीची संचालक आहे. दरम्यान, २०११ मध्ये मी एक जमीन आणि कंपनी आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सना विकली होती. एअरपोर्टच्या जवळ असलेल्या या जमिनीचे सगळे कागद माझ्या सीएने तपासले आहेत. त्यानंतर या कंपनीशी माझा काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण राज कुंद्रा यांनी दिलं होतं.

राज कुंद्रा यांचं स्पष्टीकरण

‘2011 मध्ये मी एक जमीन आणि कंपनी आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सला विकली होती. एअरपोर्टच्या जवळ असलेल्या या जमीनीचे सर्व कागदपत्र माझ्या सीएने तपासली आहेत. त्यानंतर या कंपनीशी माझा काहीही संबंध नाही. या कंपनीवर कर्जामुळेही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र, त्यावेळी ही कंपनी माझ्या मालकीची नव्हती. माझ्या कंपनीवर कुठल्याही प्रकारचं कर्ज नाही आणि आम्ही या कंपनीसाठी कुठलंही कर्ज घेतलेलं नाही. त्यामुळे जे काही आरोप करायचे आहेत, ते या कंपनीच्या मालकांवर व्हायला हवे’, असं म्हणत राज कुंद्रा यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या