गँगस्टर रवी पुजारीला ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

रवी पुजारी मागील अनेक वर्षांपासून फरार होता. दोन वर्षापुर्वी कर्नाटक पोलिसांच्या प्रयत्नांमुळे रवी पुजारीच्या दक्षिण आफ्रिकेतील सेनेगल येथे अटक करण्यात आली.

गँगस्टर रवी पुजारीला ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
SHARES

कुख्यात गुंड रवी पुजारीला मंगळवारी कर्नाटकवरून मुंबईत आणण्यात आलं. त्यानंतर त्याला मुंबई सत्र न्यायालयासमोर कुलाब्यातील गजाली रेस्टॉरंटमधील गोळीबार प्रकरणी मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने रवी पुजारीला ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

रवी पुजारीवर खून आणि खंडणीसह ४९ हून अधिक गुन्ह्यांची नोेंद आहे. रवी पुजारी मागील अनेक वर्षांपासून फरार होता. दोन वर्षापुर्वी कर्नाटक पोलिसांच्या प्रयत्नांमुळे रवी पुजारीच्या दक्षिण आफ्रिकेतील सेनेगल येथे अटक करण्यात आली. मात्र खोटी ओळख आणि राष्ट्रीयत्वाचा मुद्दा पुढे करत पुजारीने भारतातील संभाव्य प्रत्यार्पण रोखून धरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मुंबई गुन्हे शाखा आणि कर्नाटक पोलिसांनी अथक प्रयत्न करुन तो रवी पुजारीच असल्याचे सिध्द केले आणि भारतात त्याच्याविरुध्द दाखल असलेल्या दीडशेहून अधिक गंभीर गुन्ह्यांची कुंडलीच त्यांच्यासमोर मांडली. त्यामुळे पुजारीचे भारतात प्रत्यार्पण झाले. तेव्हापासून तो कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात होता. 

पुजारीचा ताबा मिळवण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे काही दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. अखेर मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाला  गजाली हॉटेलमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी पुजारीचा ताबा मिळाला. कर्नाटक हायकोर्टाच्या आदेशानंतर रवी पुजारीची कस्टडी मुंबई पोलिसांना देण्यात आली. 

कर्नाटकातील उडुपीचा रहिवासी असलेला रवी पुजारी परदेशातून वसुलीचे रॅकेट चालवायचा. यातून तो मोठे व्यवसाय करणारे, सेलिब्रिटी आणि इतर श्रीमंत लोकांना टार्गेट करायचा.रवी पुजारीविरोधात महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकात हत्या, हत्येचा प्रयत्न, वसुली इत्यादी प्रकरणाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा