5 लाखांचं सोनं उंदरानं पळवलं, पोलिसांनी फिल्मीस्टाइल लावला 10 तोळे सोन्याचा छडा

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर सोन्याचे दागिने जप्त केले. दागिने सापडल्यानंतर महिलेनं सुटकेचा निश्वास सोडला.

5 लाखांचं सोनं उंदरानं पळवलं, पोलिसांनी फिल्मीस्टाइल लावला 10 तोळे सोन्याचा छडा
(Representational Image)
SHARES

एका उंदरांच्या ताब्यातून मुंबई पोलिसांनी 10 तोळे सोने जप्त केले आहे. होय... होय... तुम्ही अगदी बरोबर वाचलंत. ही विचित्र घटना मुंबईतील दिंडोशी परिसरात घडली. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी याप्रकरणाचा छडा लावला. पिशवीतील सोन्याची किंमत सुमारे 5 लाख रुपये आहे.

आता घरात ठेवलेले सोनं उदरानं कसं चोरलं असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. तर झाले असे की, दिंडोशी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आरे कॉलनी परिसरात राहणाऱ्या सुंदरी प्लानिबेल यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडण्यासाठी घरात ठेवलेले 10 तोळे सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेवण्यासाठी त्या निघाल्या. यावेळी त्यांना वाटेत एक भिक्षेकरी स्त्री आणि तिचे मूल दिसले. तेव्हा सुंदरी यांनी वडापाव असलेली पिशवी त्या मुलाला दिली आणि बँकेकडे निघून गेल्या.

बँकेत पोहोचल्यानंतर मुलाला दिलेल्या वडापावच्या पिशवीत सोन्याचे दागिने होते, हे त्यांच्या लक्षात आले आणि पायाखालची जमीनच सरकली. त्या लगेच बँकेतून निघाल्या आणि ज्या ठिकाणी आपल्या मुलासोबत भिक्षेकरी महिला बसली होती. तिथे पोहचल्या. पण, तेथून ती महिला निघून गेली होती. यानंतर सुंदरी यांनी लगेच पोलिस स्थानकाकडे धाव घेतली.

दिंडोशी पोलिसांच्या तपास पथकाचे प्रमुख सुरज राऊत यांनी तत्काळ या प्रकरणाचा तपास सुरू केला. अधिकारी सूरज राऊत यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा त्यांना घटनास्थळावरून भिक्षेकरून महिला निघून जाताना दिसली.

पोलिसांनी महिलेला शोधून काढले आणि वडपावच्या पिशवीबद्दल विचारणा केली. तेव्हा वडापाव सुकलेला होता, म्हणून आपण ती पिशवी कचरागाडीत टाकून दिली, असे त्या महिलेने सांगितले.

ही माहिती मिळताच पोलिसांनी भिक्षेकरी महिलेने ज्या ठिकाणी कचरा फेकला होता, त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पिशवी शोधण्यास सुरुवात केली. मात्र, ती तिथे पिशवी सापडली नाही. तेव्हा पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही फूटेज तपासले असता भिक्षेकरी महिला कचरा पेटीत पिशवी फेकून देताना दिसून आली.

पण, त्यानंतर ती पिशवी एक उंदीर जवळच्या नाल्यात घेऊन जात असल्याचेही पोलिसांनी पाहिले. पिशवीतील वडापावसोबत उंदराने 10 तोळे सोनेही नाल्यात नेले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कचरा गाडीजवळ असलेल्या गटारातून सोन्याचे दागिने असलेली पिशवी बाहेर काढली आणि महिलेला दागिने सोपवले.हेही वाचा

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या नावानं महिलेवर बलात्कार, गुन्हा दाखल

३ दिवसांपासून अनेक भारतीय साइट्सवर सायबर हल्ले, माफी मागा नाहीतर....

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा