SHARE

धावत्या लोकलमधून प्रवाशांचे मोबाइल हिसकावून पळ काढणाऱ्या एका सराईत चोराला कुर्ला आरपीएफने शनिवारी अटक केली. या आरोपीकडून पोलिसांनी एक मोबाइल हस्तगत केला असून त्याने याप्रकारे अनेक मोबाइल आतापर्यंत लंपास केल्याची माहिती आरपीएफने दिली आहे. शत्रधून यादव (18) असे या आरोपीचे नाव असून तो कळवा परिसरातील राहणारा आहे.

शनिवारी सायंकाळी कुर्ला आरपीएफचे हवालदार दिनेश पाटील आणि डी. बी. शिंदे हे कुर्ला स्थानकावरील हार्बर रेल्वे मार्गाच्या फलाट क्रमांक 8 वर गस्त घालत होते. याच दरम्यान सीएसटीकडे जाणारी ट्रेन फलाटावर आल्यानंतर काही वेळातच या आरोपीने एका प्रवाशाचा मोबाइल हिसकावून चालती ट्रेन पकडली. गस्तीवर असलेल्या पाटील आणि शिंदे यांनी हा प्रकार पाहताच त्यांनीही चालती ट्रेन पकडून या आरोपीला चुनाभट्टी रेल्वे स्थानकात पकडले. या आरोपीला पुढील तपासासाठी वडाळा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या