किशोरी पेडणेकर, संदीप राऊत यांची ईडीकडून सात तास चौकशी

मुंबई महापालिकेच्या खिचडी घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा भाऊ संदीप याची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी सुरू आहे.

किशोरी पेडणेकर, संदीप राऊत यांची ईडीकडून सात तास चौकशी
SHARES

कोविड काळामध्ये मुंबई महानगरपालिकेने खरेदी केलेल्या बॉडी बॅग्जमध्ये झालेल्या कथित घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची तसेच खिचडी घोटाळ्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांची मंगळवारी सात तास चौकशी केली.

कोविड काळामध्ये पालिकेने बॉडी बॅग्स या एका खासगी कंपनीकडून तिप्पट दराने खरेदी केल्याचा आरोप करत या प्रकरणी ४ ऑगस्ट २०२३ रोजी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणात एकूण ४९ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप असून संबंधित कंपनीकडून खरेदी करण्याचे आदेश किशोरी पेडणेकर यांनी दिल्याचाही आरोप आहे.

सकाळी ११ वाजता किशोरी पेडणेकर ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्या. याप्रकरणी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ईडीने त्यांची सहा तास चौकशी केली होती. चौकशीनंतर पेडणेकर म्हणाल्या की, “साडे सहा तास नव्हे तर केवळ एक तास चौकशी करण्यात आली. बाकीच्या वेळेत पेपर वर्क करण्यात आले. तसेच, किश्त कंपनीशी निगडीत ईडीने चौकशी केली. त्यांना या कंपनीशी संबंधित तसेच बॉडी बॅगसंदर्भात काही कागदपत्रे हवी आहेत. ती कागदपत्रं मी माझ्या वकिलांमार्फत त्यांच्याकडे पोहोचवणार आहे. तपास यंत्रणांना सहकार्य करणे हे आमचं काम असून यापुढेही चौकशीला हजेरी लावणार आहे.”

राजीव साळुंखे यांनी केलेल्या आर्थिक व्यवहारांसदर्भात संदीप राऊत यांना ईडीने प्रश्न विचारले. यानंतर संदीप राऊत म्हणाले की, “हा घोटाळा नव्हे. कामगारांच्या खात्यात पैसे वळते करण्यासाठी राजीव साळुंखे यांच्याकडून मी पैसे घेतले. राजीव साळुंखेने माझ्याकडे मदतीची मागणी केली, माझ्याकडे सर्व यंत्रणा उपलब्ध असल्यामुळे मी त्यांना मदत केली. मानवतेच्या नात्यातून ही मदत करण्यात आली. राजीव यांनी माझे कार्यालय, वाहतूक करणारी वाहने, कामगार तसेच माझ्या अन्य वस्तू वापरल्या. सामाजिक कार्य म्हणून मी त्यांच्याकडून पैसे स्वीकारले नाहीत तर कामगारांचे पगार देण्यासाठी ते पैसे घेण्यात आले. ईडीने विचारलेल्या सर्व प्रश्नांना मी उत्तरे दिली असून मी त्यांना पूर्ण सहकार्य करणार आहे.”



हेही वाचा

भाजप विनोद तावडे, पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठणार?

महाराष्ट्राच्या 'या' खासदारांचा कार्यकाळ संपणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा