रेल्वेतून लॅपटॉप चोरणारी टोळी गजाआड

सीएसटी - रेल्वे मुंबईकरांची लाइफलाइन. पण रेल्वेतल्या गर्दीचा फायदा घेऊन या लाइफलाइनमध्ये अनेक चोऱ्या झाल्यात. रेल्वेत तर रेल्वेत पण आता एक्स्प्रेसमध्येही चोरांनी चोरी सुरु केली आहे. जीआरपी पोलिसांनी एक्स्प्रेस ट्रेनच्या डब्यात चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश केलाय. विशेष म्हणजे ही टोळी केवळ लॅपटॉप चोरी करण्यासाठी उत्तरप्रदेशातून मुंबईला येत असे. या टोळीकडून तब्बल 27 मॅकबुक जप्त करण्यात आले आहेत. त्यांची एकूण किंमत 30 लाखांच्या घरात आहे.

लॅपटॉप चोरीच्या एका गुन्ह्याचा तपास करताना सीएसटी पोलिसांनी जगदीश सोनी नावाच्या इसमाला ताब्यात घेतले. जगदीशकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी कमलेश यादव आणि दिनेश निर्मल यांना फिरोजाबादहून अटक केली. या टोळीने आणखीही अश्या चोऱ्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.

Loading Comments