गौरी लंकेश यांच्या हत्येतील आरोपींचा 'या' स्फोटक प्रकरणात सहभाग


गौरी लंकेश यांच्या हत्येतील आरोपींचा 'या' स्फोटक प्रकरणात सहभाग
SHARES

पत्रकार गौरी लंकेश हत्याकांडातील मुख्य आरोपी सुजीत कुमार आणि भरत कुरणे यांचा सहभाग नालासोपारा येथील स्फोटकातही स्पष्ट झाल्याने बुधवारी एटीएसने त्यांचा ताबा घेतला आहे. पद्मावत सिनेमादरम्यान बेळगावात झालेला बॉम्बस्फोट आणि सनबर्न फेस्टिव्हल दरम्यान आखलेला बॉम्बस्फोटाच्या कटात या दोघांचाही सहभाग असल्याचं एटीएसच्या तपासादरम्यान पुढे आलं आहे. या दोघांवर एटीएसने गुन्हा नोंदवला असून न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यामुळे या प्रकरणात आता अटक आरोपींची संख्या ९ वर पोहचली आहे.


९ जणांना अटक

नालासोपारा स्फोटकांप्रकरणी पोलिसांनी वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर, अविनाश पवार, वासुदेव सूर्यवंशी आणि लीलाधर उर्फ विजय उर्फ लंबू उखर्डूली लोधी या ९ जणांना आतापर्यंत अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास करताना, एटीएस आणि सीबीआयला डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले.

पोलिस चौकशीत शूटर सचिन अंधुरेचे नाव पुढे आल्यानंतर शरद कळसकरचा सहभागही निश्चित झाला. मात्र ही दोन्ही प्रकरणं उघडकीस आली ती पत्रकार गौरी लंकेश हत्याकांडातील मुख्य सूत्रधार अमोल काळेच्या अटकेनंतर. त्यामुळे अधिक चौकशीसाठी आता काळेचा ताबा मिळावा यासाठी सीबीआय प्रयत्न करत आहेत.


चौकशीतून 'यांची' नावं समोर

गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर कर्नाटक पोलिसांनी अमोल काळे याला अटक केली. त्याच्या चौकशीतून शरद कळसरकर, वैभव राऊत आणि गुधन्वा गोंधळेकर यांची नावं पुढे आली. या तिघांच्या चौकशीत हा गुंता पुढे सोडवण्यात एटीएस, सीबीआयला यश आलं. याच प्रकरणात, राऊतच्या चौकशीतून लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी अटक केलेल्या कुमार आणि कुरणे यांची नावं समोर आली.


'हे' दोघेही वैभव राऊतच्या संपर्कात

बंगळुरूचा कुमार हा ३ महिन्यांपासून तर बेळगावचा कुरणे गेल्या दीड महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहे. कर्नाटक पोलिसांकडून दोघांचा ताबा मिळताच, बुधवारी दोघांना स्फोटकांप्रकरणी एटीएसने अटक केली. त्यांना सत्र न्यायालयात हजर करत कोठडीची मागणी केली.

स्फोटके प्रकरणात जप्त स्फोटकांमध्येही दोघांचा सहभाग असल्याची शक्यता एटीएसने न्यायालयात वर्तवली. हे दोघेही वैभव राऊतच्या संपर्कात होते. त्यांनी सोबतच शस्त्र तसेच बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घेतल्याचा संशय एटीएसला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा