मुंबईच्या विद्यापीठात बोगस गुणपत्रिकेच्या मदतीने अनेकांना उतीर्ण करणाऱ्या टोळीचा बीकेसी पोलिसांनी पर्दाफाश केला होता. याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वी पाच आरोपींना अटक केली होती. मात्र मागील मास्टर माइंड जेनील शाहा हा फरार होता. अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
मुंबई विद्यापीठातील अनागोंदी कारभाराचं आणखी एक प्रकरण 16 ऑक्टोबर रोजी पुढे आलं होतं. मुंबई विद्यापीठात पेपर घोटाळ्यानंतर बनावट गुणपत्रिकांचं प्रकरण पुढे आलं. या प्रकारामुळे विद्यापीठाचं नाक पुन्हा एकदा कापलं गेले. मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत गरवारे इन्स्टिट्यूट मास्टर ऑफ सबस्टॅन्शिअल डेव्हलपमेंट या परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत फेरफार करून बनवट गुुुुणपत्रिकेद्वारे विद्यार्थ्यांना उतीर्ण केलं जात होतं. याबाबत विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी बीकेसी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.
पोलिसांनी गुणपत्रिका ठेवलेल्या ठिकाणाचं सीसीटीव्ही फुटेज पडताळले. त्यावेळी तिघेही गुणपत्रिका काढताना आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी तपासादरम्यान रंजन सिंग, सुनिल चौधरी, दत्ताञय कांगणे, गणेश घुगरे आणि हरिष मिसाळ यांना अटक केली होती. मात्र यामागील मास्टर माइंड जेनील हा फरार होता. अखेर जेनील हा त्यांच्या घरातल्यांना भेटायला येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.