बोरिवलीत क्षुल्लक कारणावरून तरुणाची हत्या


बोरिवलीत क्षुल्लक कारणावरून तरुणाची हत्या
SHARES

गॅरेजच्या जागेच्या भाड्याचा वाद विकोपाला गेल्याने दोघांनी एका तरुण मॅकेनिकची हत्या केल्याची घटना बोरिवलीत उघडकीस आली आहे. या दोघांनी लोखंडी पाईपने मॅकेनिकची हत्या केली. संजय जयप्रकाश पटवा असं मृत तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी कस्तुरबा पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.


संपूर्ण प्रकार?

बोरिवलीच्या पश्चिम द्रुतगती मार्गावर मृत संजय पटवा आणि नौशाद अली यांनी भागीदारीत शंकर ऑटो गॅरेज भाड्याने विकत घेतलं होते. त्या ठिकाणी दोघेही गाड्यांची दुरूस्ती करून गॅरेज मालकाला एकत्र प्रति महिना दहा हजार रुपये भाडे देत होते. त्यात संजय सहा आणि नौशाद चार हजार रुपये भाडे द्यायचा. मात्र मागील काही दिवसांपासून नौशादचा व्यवसाय पूर्णपणे बसला होता. हाताला काम मिळत नसल्यामुळे भाड्याची रक्कम त्याला देता येत नव्हती. या कारणावरून संजय आणि नौशाद यांच्यात वारंवार खटके उडत होते.

सोमवारी हे दोघेही गॅरेजमध्ये दारू पित बसले होते. त्यावेळी याच कारणांवरून दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, नौशाद आणि त्याचा मित्र नेताब अली यांनी संजयला लोखंडी पाईपने मारहाण केली. या मारहाणीत संजय गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरता जवळील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 

या प्रकरणी कस्तुरबा पोलिसांनी नौशाद आणि नेताबला अटक केली असून अधिक तपास सुरू असल्याचं कस्तुरबा पोलिसांनी सांगितलं.

संबंधित विषय