मॉडेल कृतिकाच्या मृत्यू प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल

  Andheri
  मॉडेल कृतिकाच्या मृत्यू प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल
  मुंबई  -  

  स्ट्रगलिंग अॅक्ट्रेस आणि मॉडल कृतिका चौधरी हिच्या गूढ मृत्यू प्रकरणी अंबोली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. कृतिकाच्या शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाला असून तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त अरुण चव्हाण यांनी सांगितले. कृतिका अंधेरीतील चार बंगला येथील भैरवनाथ एसआरए इमारतीत राहात होती. सोमवारी दुपारी अंधेरीत राहत्या घरी कृतिकाचा मृतदेह आढळला. तिच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी आत जाऊन पाहणी केली असता तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला.

  कृतिकाच्या घरचा दरवाजा बाहेरून बंद होता. एवढेच नाही तर, घरातील ऐसी देखील सुरूच होता. तिची हत्या तीन ते चार दिवसांपूर्वी झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. कृतिकाच्या घरात नकल डस्टर देखील सापडला असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कृतिकाच्या डोक्यावर याच नकल डस्टरने प्रहार करून तिची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

  या प्रकरणी अंबोली पोलिस तसेच गुन्हे शाखा देखील समांतर तपास करत आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी देखील पोलीस करत आहेत. मूळची हरिद्वारची रहिवासी असलेली कृतिका बाॅलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आली होती. तिने अनेक छोट्या-मोठ्या भूमिका देखील केल्या आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.