सायबर गुन्ह्यात मुंबई दुसरी

सायबर गुन्हे झपाट्याने वाढत असतानाच अटक आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण फक्त २५ टक्के असल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्रात हेच प्रमाण १८ टक्के आहे. उत्तर प्रदेशात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण जास्त असले तरी, आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण ६४ टक्के आहे.

सायबर गुन्ह्यात मुंबई दुसरी
SHARES

‘सद्‍रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्‍यानुसार २४ तास नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहणाऱ्या पोलिसांसमोर सायबर गुन्ह्यांचे मोठे आव्हान दिवसेंदिवस वाढत आहे. २१ व्या शतकात तंत्रज्ञानाने आपल्या जीवनाला गती दिली असली. तरी त्याचबरोबर नव्या गुन्हेगारीलाही जन्म दिला आहे. या गुन्हेगारीची सर्वाधिक झळ ही सध्या देशाची आर्थिक राजधानी मुंबईला पोहचत आहे. या सायबर गुन्ह्यांपासून मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष सायबर पोलिसांची निर्मिती करण्यात आली खरी, मात्र निर्मिती करताना भविष्यातील आव्हानांचा फारसा विचार न केला गेल्यामुळे सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यात आज असंख्य अडचणी येत आहेत. या वाढत्या गुन्ह्यांमुळे पोलिस आता जेरीस आले आहेत.

देशात सर्वाधिक सायबर गुन्हे घडलेल्या शहरांमध्ये बेंगळुरू (२,७४३) 'अव्वल' स्थानी आहे. त्यानंतर मुंबईचा (१,३६२) दुसरा क्रमांक लागतो. त्यापाठोपाठ जयपूर (६८५) आणि पुणे (३१८) येथे सायबर गुन्हे दाखल झाले आहेत.  देशाच्या गुन्हेगारीचा लेखाजोखा मांडणारा 'क्राइम इन इंडिया २०१७' हा अहवाल सरकारने नुकताच प्रसिद्ध केला आहे. वाढत्या सायबर गुन्ह्यांशी दोन हात करण्याचे प्रमुख आव्हान असल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

देशात २०१६ मध्ये १२,३१७ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली असून, २०१७ मध्ये गुन्ह्यांची वाढ जवळपास दुपटीने (२१,७९६) झाली आहे. देशातील सर्वाधिक सायबर गुन्हे उत्तर प्रदेशात (४,९७१) घडले असून, त्या पाठोपाठ महाराष्ट्र (३,६०४) आणि कर्नाटक (३,१७४) ही राज्ये अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. देशात सायबर गुन्ह्यांची नोंद भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि माहिती-तंत्रज्ञान कायदा (आयटी) अशा दोन प्रकारे होते. फसवणुकीच्या उद्देशाने (१२,२१३) सर्वाधिक सायबर गुन्हे घडले आहेत. त्यापाठोपाठ एटीएम घोटाळे (१५४३), क्रेडिट, डेबिट कार्ड घोटाळे (३९५), ऑनलाइन घोटाळे (८०४), ओटीपी घोटाळे (३३४), बनावट प्रोफाइल (८६) गुन्हे दाखल झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सायबर गुन्हे झपाट्याने वाढत असतानाच अटक आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण फक्त २५ टक्के असल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्रात हेच प्रमाण १८ टक्के आहे. उत्तर प्रदेशात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण जास्त असले तरी, आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण ६४ टक्के आहे. महाराष्ट्रात सायबर गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढविण्याची आवश्यकता आहे.

सायबर गुन्ह्यांमागील कारणे काय?

कारण                        गुन्हे

वैयक्तिक वैमनस्य             ६२८

राग                              ७१४

फसवणूक                     १२,२१३

खंडणी                          ९०६

बदनामी                        १,००२

खोड्या                          ३२१

लैंगिक छळ                   १४६०

राजकीय हेतू                  १३९

दहशतवादी कारवाई          ११०
संबंधित विषय