मुंबईत हाय अलर्ट


मुंबईत हाय अलर्ट
SHARES

मुंबई - उरण शहरात पाच ते सहा संशयित तरुण दिसल्याच्या बातमीने एकच खळबळ उडाली आहे. मुंबईसह नवीमुंबई परिसरात हाय अलर्ट देण्यात आला असून महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी किनाऱ्यावरची सुरक्षा आणि गस्त वाढवली असून स्थानिक मच्छिमारांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारांवरही नाकाबंदी करण्यात आली असून वाहने आणि संशयित व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे. मंत्रालय, पोलीस आयुक्तालय, पोलीस महासंचालक कार्यालय, सर्व रेल्वे टर्मिनन्स, मंदीर अशा गर्दीच्या आणि अतिसंवेदनशील ठिकाणी मुंबई पोलिसांसह शिघ्रकृती दल, फोर्स वन, केंद्रीय आणि राज्य राखीव दलाच्या तुकड्या जागोजागी तैनात करण्यात आल्या आहेत.

"सुरक्षेच्या संदर्भात मुंबई पोलिसांकडून सर्व प्रकारची खबरदारी घेतली जात आहे," असे पोलीस प्रवक्ते अशोक दुधे यांनी सांगितले. उरण परिसरात ५ ते ६ पठाणी घातलेले आणि हातात बंदुका आणि पाठीवर बॅगा घेतलेले तरुण दिसल्याचा दावा दोन शाळकरी मुलांनी केल्यानंतर देशातील सर्वच यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. नौदल शस्त्रसाठा भांडार आयएनएस अभिमन्यू हे जवळच असल्याने नौदलाने तात्काळ याची दखल घेत हेलिकॉप्टरच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली आहे. त्यासह दहशतवाद विरोधी पथके, लष्कर, भारतीय तटरक्षक दल आणि पोलीस यांनी देखील संशयितांचा शोध सुरू केला आहे. केंद्राची मार्कोस टीम या परिसरात पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान सध्या मुलांच्या मदतीने संशयितांचे चित्र काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा