Exclusive : मुंबई पोलिसांचे सीसीटिव्ही आॅपरेटर स्ट्राइकवर ?

मुंबई पोलिसांकडे नोंदवण्यात आलेले गुन्हे उलगडण्यात याच सीसीटिव्ही आॅपरेटरांची भूमिका ही महत्वाची राहिलेली आहे.

Exclusive : मुंबई पोलिसांचे सीसीटिव्ही आॅपरेटर स्ट्राइकवर ?
SHARES

ऐकीकडे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. तर दुसऱ्या बाजूला वेतनाबाबतच्या मुद्यांवरून मुंबई पोलिसांचे सीसीटिव्ही आॅपरेटर संपावर गेल्याने आर्थिक राजधानी मुंबईची सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्यानंतर शहराच्या सुरक्षेसंदर्भात ६००० सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचे जाळे टप्या टप्याने उभे करण्यात आले. हे  सीसीटिव्ही यंत्रणा उभारणीचे काम गृहखात्याने ‘एलअण्ड टी’ या कंपनीला देण्यात आले होते. तर या सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या देखभालीचे, आँपरेटींग आणि तांत्रिक अडचणी सोडवण्याचे काम ‘सीएमएस’ कंपनीला देण्यात आले होते. मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या पाचव्या माळ्यावरून या सीसीटिव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने मुंबईच्या कानाकोपऱ्यावर लक्ष ठेवले जाते. या सीसीटिव्ही कंट्रोलरुममध्ये मुख्यता माजी पोलिस कर्मचाऱ्यांचीच मुलं कार्यरत आहेत.

मागील सहा महिन्यांपासून त्या कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. “२ वर्षांपासून वेतन वाढ झालेली नाही. अनेक महिन्यांपासून पगार ही वेळत मिळत नाही. करारानुसार महिन्याच्या ८ तारखेला मिळणारा पगार १४ तारखेला दिला जातो. पीएफ ही अनेकांचा अडीच तीन वर्ष दाखवला जात नाही.” एलअँण्डटीचा प्रोजेक्ट असल्याने या कर्मचाऱ्यांनी अनेकदा त्यांच्याशी चर्चा करण्यासंदर्भात पत्र व्यवहार केला. मात्र अद्याप त्याची दखल घेण्यात न आल्यामुळे मंगळवार पासून कंट्रोलरुमधील ४३ जणांनी संप पुकारत कामावर येणं बंद केलं असल्याची माहिती सुत्रांनी दिली.  त्यामुळे कंट्रोलरुममधील सीसीटिव्ही यंत्रणा हाताळण्यासाठी झोनल कंट्रोलरुममधील मुलांची मदत घेतली जात आहे. त्यामुळे सध्या कंट्रोल रुमचे काम हे फक्त १० जणांवर सुरू असून चार शिफ्टमध्ये चालणारे काम फक्त दोन शिफ्टमध्येच चालत असल्याचे कळते. 

मागील अनेक वर्षापासून आमची कंपनी पोलिसांच्या सहकार्याने काम करत आहे. कंपनीतील काही कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या संपामुळे सीसीटिव्ही यंत्रणेच्या कार्यात कुठलाही अडथळा निर्माण झालेला नाही.  त्याचबरोबर  मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेला ही कुठली बाधा पोहचलेली नसल्याचे सीएमएस कंपनीच्या कायदेशीर सल्लागारांनी सांगितले. 


आॅपरेटरांची भूमिका महत्वाची

मुंबई पोलिसांकडे नोंदवण्यात आलेले गुन्हे उलगडण्यात याच सीसीटिव्ही आॅपरेटरांची भूमिका ही महत्वाची राहिलेली आहे. गुन्हा घडलेल्या ठिकाणचे सीसीटिव्ही फूटेज काढून तो आरोपी ज्याज्या मार्गे पुढे पळ काढतो. त्याचा माग हे सीसीटिव्ही आॅपरेटर काढून पोलिसांना त्याची माहिती देत असतात. मुंबईतील सीसीटीव्ही यंत्रणेत जागतिक दर्जाचे व उच्च क्षमता असलेले १४९२ कॅमेरे, २० थर्मल कॅमेरे, ४८५० फिक्स बॉक्स कॅमेरे यांचा समावेश आहे.

शहरातील १५१० संवेदनशील ठिकाणी हे कॅमेरे बसविले आहेत. सप्टेंबर, २०१७ ते ऑक्टोबर, २०१८ या कालावधीत मुंबईतील सीसीटीव्हीच्या मदतीने ७०० आरोपींना पकडले. सुमारे १२००हून अधिक गुन्हे सोडविण्यासाठी मुंबई पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजचा वापर केला.५२०पेक्षा अधिक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले.

सीसीटिव्ही कॅमेरा हाताळण्याचे काम खासगी कंपनीकडे सुपूर्द करण्यात आले असून त्यांचा आणि मुंबई पोलिसांचा कुठलाही थेट संबध नाही. सीसीटिव्हीद्वारे तपास करणारी सक्षम यंत्रणा मुंबई पोलिसांकडे सदैव कार्यरत असते. त्यामुळे खासगी कंपनीच्या अंतर्गत प्रकरणाचा मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेवर कुठलाही परिणाम होत नाही.

प्रणय अशोक, मुंबई पोलिस प्रवक्ते

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा