शहरात पुन्हा नशेचा अंमल


शहरात पुन्हा नशेचा अंमल
SHARES

एकीकडे शहरात नशेच्या अंमलावर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई पोलिसांचा प्रयत्न सुरू असताना तस्करांनी आता मुंबईबाहेरून शहरात अंमली पदार्थांची तस्करी करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत कोट्यावधी रुपयांचे अंमली पदार्थ हस्तगत केले आहे. मुंबईच्या अंमली पदार्थ विभागाने ६ कोटींच्या हेरॉईन अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीस माटुंगा येथून अटक केली आहे. तर अंबोली पोलिसांनी बदलापूरच्या एमआयडीसीतील केमिकल कंपनीतून ७ कोटी ५० लाखाच्या एमडीसह अंमली पदार्थ पकडले आहे.


सापळा रचून कारवाई

राजस्थानहून मुंबईत मोठ्या प्रमाणात हेरॉईनच्या तस्करीसाठी एक व्यक्ती येणार असल्याची माहिती एएनसीचे पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांना मिळाली. त्यानुसार लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वांद्रे एएनसी युनिटचे पोलिस निरीक्षक वडवणे यांच्या पथकाने मांटुग्याच्या भाऊ चिकित्सालयाजवळ पाळत ठेवली होती. त्यावेळी पोलिसांनी मंगिलाल मेघावल (४०) याला संशयित म्हणून ताब्यात घेत, त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळील बॅगेत ४ किलो १०० ग्रॅम हेरॉईन आढळून आली. त्याची किंमत बाजारात ६ कोटी १५ लाख इतकी आहे. 


७ कोटी ५० लाखांचं ड्रग्ज जप्त

याप्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे. तर दुसऱ्या कारवाईत अंबोली परिसरात एक जण एमडी हे ड्रग्ज तस्करीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक दया नायक यांना मिळाली. त्यानुसार दया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शाहिद हुसेन शेर मोहम्मद शाह (२७) याला अटक केली. त्याच्याजवळ पोलिसांना ३०० ग्रॅम एमडी ड्रग्ज आढळून आलं. पोलिसांच्या चौकशीत त्याने हा ड्रग्ज बदलापूरच्या श्री शारदा केमिकल्स, एमआयडीसी, बदलापूर येथे रासायनिक पदार्थपासून बनवला जात असल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी १४ एप्रिल रोजी त्या केमिकल्स कंपनीवर कारवाई केली. त्यावेळी केमिकल्स कंपनीत नारायणभाई मंगलदास पटेल (७४) याच्याजवळ पोलिसांना तीन प्लास्टिक कॅनमध्ये प्रत्येकी २५ लिटर प्रमाणे ७५ लीटर एमडी द्रव्य मिळून आले. ज्याची बाजारात किंमत ७ कोटी ५० लाख इतकी आहे.

या दोन्ही कारवायांवरून पोलिसांनी तस्करांच्या मुस्क्या आवळत त्यांना कायद्याच्या बंधनात अडकवण्यासाठी मुंबई पोलिसांनी चांगलीच कंबर कसली असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा