मुंबईत बलात्कार, विनयभंगाच्या गुन्ह्यात 'इतकी' वाढ

२०१३-१४ या वर्षभरात बलात्काराचे ४३२ गुन्हे, तर विनयभंगाचे १२०९ गुन्हे नोंदवण्यात आले. २०१७-१८ मध्ये बलात्काराचे ७९२ व विनयभंगाचे २३५८ गुन्हे दाखल झाले आहेत.

मुंबईत बलात्कार, विनयभंगाच्या गुन्ह्यात 'इतकी' वाढ
SHARES

"कॉस्मोपॉलिटन सिटी' अशी ओळख असलेल्या महानगरी मुंबईत२०१३ ते २०१८  या काळात बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यांत अनुक्रमे ८३ टक्के व ९५ टक्के अशी मोठी वाढ झाली आहे. याच काळात दंगलीचे गुन्हे ३६ टक्‍क्‍यांनी आणि लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारांच्या तक्रारी १९ टक्‍क्‍यांनी वाढल्या आहेत. मुंबईत महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सतत वाढ होत असल्याचे चित्र काही वर्षांत समोर येत आहे.

२०१३-१४ या वर्षभरात बलात्काराचे ४३२ गुन्हे, तर विनयभंगाचे १२०९ गुन्हे नोंदवण्यात आले. २०१७-१८ मध्ये बलात्काराचे ७९२ व विनयभंगाचे २३५८ गुन्हे दाखल झाले आहेत. २०१८मध्ये ८९९ गुन्ह्यांची नोंद आहे.तर विनयभंगाच्या गुन्ह्यांची संख्या २५८६ इतकी आहे. २०१८-१९ मध्ये  बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद १०१५, तर विनभंगाच्या गुन्ह्यांची २६७८ इतकी नोंद करण्यात आली आहे.  २०१३-१४ बलात्काराच्या गुन्ह्यांत ८३ टक्के तर विनयभंगाच्या गुन्ह्यांत ९५ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे.

तसेच, लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांचे प्रमाण १९ टक्‍क्‍यांनी वाढले आहे. बालकांविरोधातील लैंगिक अत्याचाराचे २०१५-१६ मध्ये ८९१, २०१६-१७ मध्ये ९२८ व २०१७-१८ मध्ये एक हजार ६२ गुन्हे दाखल झाले होते. २०१९ मध्ये अल्पवयीन मुलींवरील गुन्ह्यांची नोंद ४५९ इतकी करण्यात आली आहे. याशिवाय मुंबई दंगलीच्या गुन्ह्यांमध्येही ३६ टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. २०१३-१४ या वर्षात मुंबईत दंगलीचे ३८७ गुन्हे दाखल होते. त्यानंतर २०१४-१५, २०१५-१६, २०१६-१७ व २०१७-१८ या कालावधीत अनुक्रमे ३५३, ४५२, ४५४ व ५२८ गुन्हे दाखल झाले.

दुसरीकडे मुंबईतील हत्या, घरफोडी, सोनसाखळी चोरी, चोरी व वाहनांच्या चोरीत घट झाली आहे. ही जमेची बाजू आहे. २०१३-१४ मध्ये हत्येचे १७१ गुन्हे दाखल होते; २०१७-१८ मध्ये त्यात ३३ टक्‍क्‍यांनी घट होऊन केवळ ११५ गुन्हे दाखल झाले होते. २०१३-१४ मध्ये घरफोडीचे तीन हजार १२ गुन्हे दाखल होते; २०१७-१८ मध्ये त्यात १९ टक्‍क्‍यांनी घट होऊन केवळ दोन हजार ४२७ गुन्हे दाखल झाले. २०१३-१४ मध्ये सोनसाखळी चोरीचे दोन हजार ११० गुन्हे दाखल होते; २०१७-१८मध्ये त्यात ९२ टक्‍क्‍यांनी घट होऊन केवळ १६२ गुन्हे दाखल झाले.

पोलिस दलात कर्मचाऱ्यांचा तुटवडा

मुंबईमध्ये महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे समोर येत असतानाच, मुंबई पोलिस दलातील विविध विभागांमध्ये २२  टक्के अधिकारी व कर्मचारी कमी असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. तपास करणारे सहायक उपनिरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक, निरीक्षक पदांमध्ये अनुक्रमे ३३ टक्के, ३५ टक्के, ३२ टक्के व १७ टक्के कमतरता आहे.

३२ टक्के लोकांना पोलिसांवर विश्‍वास नाही

प्रजा फाऊंडेशनने नेमलेल्या हंसा रिसर्च संस्थेद्वारे गुन्हा अनुभवला; पण तक्रार दिली नाही अशा २४ हजार २९० घरांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ३२ टक्के लोकांना पोलिस यंत्रणेवर विश्‍वास नाही; तर त्यातील २३ टक्के लोकांनी पोलिस अधिकाऱ्यांशी बोलणे अधिक वेदनादायी असल्याचे मत व्यक्त केले.२५ टक्के लोकांनी समस्येत पडण्याच्या मानसिकतेत नसल्याने तक्रार केली नाही.

२०१३-१४ या वर्षभरात बलात्काराचे ४३२ गुन्हे, तर विनयभंगाचे १२०९ गुन्हे नोंदवण्यात आले. २०१७-१८ मध्ये बलात्काराचे ७९२ व विनयभंगाचे २३५८ गुन्हे दाखल झाले आहेत. २०१३-१४ बलात्काराच्या गुन्ह्यांत ८३ टक्के तर विनयभंगाच्या गुन्ह्यांत ९५ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. 

२०१८-१९ या वर्षभरात बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद १०१५, तर विनभंगाच्या गुन्ह्यांची २६७८ इतकी नोंद करण्यात आली आहे

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा