लग्नाच्या डेकोरेशनची लाईट बंद करण्याच्या वादातून एकाची हत्या


लग्नाच्या डेकोरेशनची लाईट बंद करण्याच्या वादातून एकाची हत्या
SHARES

अंधेरीच्या धनगरवाडी परिसरात लग्नाच्या डेकोरेशनची लाईट बंद करण्याच्या वादातून एकाची हत्या करण्यात आली असून एकजण गंभीर जखमी आहे. मोहम्मद अंजुम वडारी असे मृताचे नाव असून त्याचा मित्र सादिक शेख गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी डी. एन. नगर पोलिसांनी जहीर शेख (20), शफीक शेख (25), आसिफ मुजावर (18) या तिघांना अटक केली आहे.

सोमवारी रात्री अंधेरी येथील धनगरवाडी परिसरात लग्नानिमित्त लाईटचे डेकोरेशन करण्यात आले होते. डेकोरेशनची ही लाईट बंद करण्यास जहीर आणि शफीक शेख वडारी याला सांगत होते. मात्र लग्न असल्याने लाईट बंद करण्यास वडारी याने नकार दिला. यामुळे जहीर आणि शफीकने अंजुम वडारी याच्यासोबत वाद घालण्यास सुरूवात केली. यावेळी सादीक मध्यस्थी करण्यासाठी आल्यानंतर वाद आणखीनच वाढत गेला. या वादाने संतापलेल्या जहीर, शफीक आणि त्याचा मित्र आसिफ यांनी वडारी आणि सादीकला बिअरची बाटली आणि बॅटने जोरदार मारहाण केली.

या हल्ल्यात वडारीचा जागीच मृत्यू झाला, तर सादीक जखमी झाला. सध्या सादिकची प्रकृती चिंताजनक असून त्याला सध्या कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी डी. एन. नगर पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून अद्याप काही आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हत्या करण्यात आलेला मोहम्मद अंजुम वडारी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर हत्येचा प्रयत्न करणे तसेच मारामारीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच तो पाच वर्षे शिक्षा भोगून आल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा