सावधान! तुमचे कॉल डिटेल्स विकले जात आहेत

 Mumbai
सावधान! तुमचे कॉल डिटेल्स विकले जात आहेत

मुंबई - डिटेक्टिव्ह एजन्सीच्या नावाखाली बेकायदेशीररीत्या कॉल डिटेल्स विकण्याचा बाजार मांडल्याप्रकरणी गुन्हे शाखा कक्ष 9 ने आणखीन एका डिटेक्टिव्ह एजन्सीच्या मालकाला अटक केली आहे. शैलेश मांजरेकर असे या इसमाचे नाव असून, त्याच्या अटकेने या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या आता तीनवर गेली आहे. काही दिवसांपूर्वी लक्ष्मण ठाकूर (30) आणि किर्तेश कवी (44) यांना अटक करण्यात आली होती.

पश्चिम उपनगरातील एका खाजगी गुप्तहेर संस्थेचे दोघे जण पैशाच्या मोबदल्यात मोबाईलचा काॅल डेटा देत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाने लक्ष्मण ठाकूरकडे बोगस ग्राहक पाठवून, एका क्रमांकाचा तीन महिन्यांपूर्वीचा काॅल डेटा मागितला. 50 हजारांवर सौदा ठरल्यावर कॉल डेटा देताना गुन्हे शाखेने ठाकूरला रंगेहाथ अटक केली होती. या दोघांकडून 134 मोबाईल क्रमांकांचा फोन डेटा देखील हस्तगत करण्यात आला होता.

आतापर्यंत पकडण्यात आलेले तिघेही खाजगी गुप्तहेर एजन्सीशी निगडित आहेत. मात्र कॉल डिटेल्स मिळवणे हे मोबाईल अधिकाऱ्यांच्या मदतीशिवाय शक्य नाहीये. आता या मोबाईल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे शाखा कधी कारवाई करणार असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय.

Loading Comments