दहिसर चेकनाक्यावर रोज भरतो ओपन बार

Mumbai  -  

मुंबईच्या प्रवेशद्वारांपैकी एक असलेल्या दहिसर टोल नाक्यावरचा एक बार सध्या जोरदार चर्चेत आहे. कारण हा बार उघ़ड्यावर चालतो आणि स्थानिक मद्यप्रेमी तिथे खुलेआम दारू आणि कबाबचा आनंद लुटताना दिसतात.

मुंबई लाइव्हच्या व्हिडिओमध्ये टोलनाका परिसरातील स्थानिक मद्यप्रेमी या ओपन बारमध्ये खुलेआम दारू आणि कबाबचा आनंद लुटताना दिसत आहेत. खरंतर या व्हिडिओत खूप कमी माणसे दिसत आहेत. पण जसजशी रात्र होते, या ठिकाणी बसून दारू पिण्यासाठी अक्षरश: रांग लागते आणि लोकं आपला नंबर येण्याची वाट बघतात.

दहिसर टोलनाक्याला लागूनच महापालिकेचे जकात कार्यालय आहे. या कार्यालयाच्या शेजारील मोकळ्या जागेवरच सायंकाळी कबाब विक्रेत्यांच्या हातगाड्या लागतात. स्थानिक मद्यप्रेमी तेथे दारू घेऊन येतात आणि गरमागरम कबाबचा आस्वाद घेत आणलेली दारू रिचवतात. दारू सोबत आणली नसेल तरी काळजी करण्याची गरज नाही. कबाबच्या गाड्यांवर काम करणारी मुले थोड्या पैशांच्या मोबदल्यात बाहेरून दारू आणून देतात.

गंमत म्हणजे उघड्यावर भरणाऱ्या या बारच्या एका बाजूला 100 मीटर अंतरावर दहिसर चेकनाका पोलीस चौकी आहे, तर दुसऱ्या बाजूला अवघ्या 20 मीटर अंतरावर काशीमिरा पोलिसांची चौकी आहे. आता या दोन्ही पोलिसांना दररोज उघड्यावर भरणाऱ्या या बारची माहिती नसेल, असे होऊच शकत नाही.

Loading Comments