नोंदणीकृत फार्मासिस्टची पोलखोल


नोंदणीकृत फार्मासिस्टची पोलखोल
SHARES

इंजिनियरींग, फार्मसी वा इतर कोणतीही पदविका वा पदवी अभ्यासक्रम असो, एका वेळीच एकच पदविका वा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. असे असताना गडचिरोलीतील एका महाविद्यालयात इंजिनियरींगचा अभ्यास करता करता मध्य प्रदेशातील भोपाळमधील फार्मसी महाविद्यालयातून डी फार्मची पदविका मिळवणाऱ्या एका नोंदणीकृत फार्मासिस्टची पोलखोल नुकतीच महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनने केली आहे. 

माहिती अधिकाराखाली ही बाब उघड झाली असून या प्रकरणाची चौकशी करत नोंदणी रद्द करण्यासह अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी करत फार्मासिस्ट असोसिएशनने महाराष्ट्र राज्य फार्मसी काउंसिलवर निशाणा साधला आहे. 


बोगस फार्मासिस्टसचा सुळसुळाट

राज्यात बोगस फार्मासिस्टसचा सुळसुळाट असल्याचा आरोप सातत्याने औषध आणि वैदयकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून केला जातो आहे. तर यासंबंधीच्या तक्रारीही आहेत. मात्र बोगस फार्मासिस्टसना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य फार्मसी काउंसिल असो वा फार्मसी काउंसिल ऑफ इंडिया कोणाकडूनच ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे बोगस फार्मासिस्टसचे फावत आहे. असे असताना फार्मसी काउंसिलकडे नोंदणी झालेल्या फार्मासिस्टवरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे, ते गडचिरोलीतील इंजिनियरींग करता करता डी फार्मची पदविका मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसारख्या प्रकरणांमुळे!


एकाच वेळी गडचिरोली आणि भोपाळमध्ये!

फार्मासिस्ट असोसिएशनला माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार गडचिरोलीतील हा विद्यार्थ्याने 2012 मध्ये भोपाळमधील एका मान्यताप्राप्त फार्मसीमहाविद्यालयात डी फार्मच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. 2015 मध्ये डी फार्म पूर्ण करत त्याने 2016 मध्ये महाराष्ट्र राज्य फार्मसी काउंसिलकडे नोंदणी केली.

दरम्यान, या विद्यार्थ्याने जेव्हा, 2012 मध्ये भोपाळमध्ये फार्मसीसाठी प्रवेश घेतला त्याचवेळी हा विद्यार्थी गडचिरोलीतील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात इंजिनियरींगचाही अभ्यास करत असल्याचे माहिती अधिकाराखाली उघड झाले आहे. तर अजूनही, 2017 मध्येही तो इंजिनियरींगचा अभ्यास पूर्ण करू शकला नसून अजूनही इंजिनियरींग करत असल्याचेही समोर आले आहे.

एकाचवेळी वेळी गडचिरोली आणि भोपाळमध्ये हा विद्यार्थी कसा काय अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो? असा प्रश्न उपस्थित करत फार्मासिस्ट काउंसिलने या विद्यार्थ्याच्या नोंदणीवर आणि पदविकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

फार्मासिस्ट असोसिएशनने यासंबंधी बुधवारी फार्मसी काउंसिलकडे तक्रार दाखल केली आहे. तर, हे हिमनगाचे एक टोक असल्याचे म्हणत असोसिएशनकडे माहिती अधिकाराखाली असे अनेक प्रकरणे समोर आली असून ही बाब गंभीर असल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच याप्रकरणी कारवाई व्हावीच, पण असे प्रकार रोखण्यासाठी काउंसिलने ठोस पाउले उचलावीत. अन्यथा, अशा फार्मासिस्टमुळे औषधांचा काळाबाजार तेजीत येऊन जनआरोग्य धोक्यात येईल, अशी प्रतिक्रिया फार्मासिस्ट असोसिएशनचे आशिष हांडे यांनी व्यक्त केली आहे.


फार्मासिस्ट असोसिएशनच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन या विद्यार्थ्याला त्वरीत 'कारणे दाखवा' नोटीस पाठवत कागदपत्रांची पाडताळणी करण्यात येईल. चौकशीत हा विद्यार्थी दोषी आढळल्यास त्याची नोंदणी रद्द करून कठोर कारवाईचा निर्णय काउंसिलच्या समितीकडून घेतला जाईल. 

राहिला प्रश्न नोंदणीचा. तर, नोंदणी ही नियमानुसारच झाली आहे. म्हणजे हा विद्यार्थी मान्यताप्राप्त फार्मसी विद्यालयाचा विद्यार्थी होता आणि त्याची नोंदणी पटलावर होती. त्याअनुषंगाने नोंदणी करून घेण्यात आली. पण जर हा विद्यार्थी इंजिनियरींग करता करता फार्मसी वा फार्मसी करता करता इंजिनियरींग करत असल्याचं आढळलं तर, यासंबंधी फार्मसी काउंसिल ऑफ इंडियाकडे तक्रार करण्यात येईल आणि मग त्यांच्याकडूनच पुढील कारवाई होईल. कारण, महाविदयालयांविरोधात कारवाई करण्याचे अधिकार महाराष्ट्र राज्य फार्मसी काउंसिलला नाहीत.

- विवेक चौधरी, सहनिबंधक, महाराष्ट्र राज्य फार्मसी काउंसिल


या विद्यार्थ्याने काउंसिलची फसवणूक केली असून असे विद्यार्थी फार्मासिस्ट म्हणून व्यवसाय करू लागल्यास नक्कीच जनआरोग्य धोक्यात येईल आणि औषधांचा काळाबाजार वाढेल. त्यामुळे, फसवणूक करणाऱ्या या फार्मासिस्टविरोधात महिन्याभरात कडक कारवाई करावी. अन्यथा, राज्यभरातील फार्मासिस्ट काउंसिलला घेराव घालतील. महत्त्वाचे म्हणजे, अशी अनेक प्रकरणे याआधीही समोर आली असून आमच्याकडे अशा अनेक तक्रारी आहेत. तर, माहिती अधिकाराखालीही अशी अनेक प्रकरणे उघड होत आहेत. त्यामुळे, अशा फसव्या आणि एका अर्थाने बोगस फार्मासिस्टना रोखण्यासाठी राज्यासह केंद्राने ठोस धोरण आखावे, हीच आमची मुख्य मागणी आहे.

- शशांक म्हात्रे, सदस्य, महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशन

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा