फार्मासिस्ट असेल तरच होलसेल औषध विक्रीसाठी परवाना

 Pali Hill
फार्मासिस्ट असेल तरच होलसेल औषध विक्रीसाठी परवाना

मुंबई - किरकोळ औषध विक्रीसाठी फार्मासिस्ट असेल तरच अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)कडून परवाना दिला जातो. मात्र त्याचवेळी होलसेल औषध विक्री परवान्यासाठी मात्र फार्मासिस्टची अट नाही. पण यापुढे मात्र होलसेलसाठीच्या नव्या परवान्यासाठी फार्मासिस्टची अट बंधनकारक करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने औषध सौंदर्यप्रसाधन कायद्यामध्ये दुरूस्ती केली असून यासंबंधीचे गॅझेट प्रसिद्ध केले आहे. त्यावर सुचना-हरकती मागवण्यात आल्या आहेत. त्यानुसार एप्रिलपासून हा कायदा लागू होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, फार्मासिस्ट नसल्याने होलसेल औषध विक्रीमध्ये अनेक गैरप्रकार होत असल्याचे समोर आले आहे. आता मात्र या नव्या दुरूस्तीमुळे या गैरप्रकाराना आळा बसेल अशी आशा व्यक्त होत आहे. त्यामुळे या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. पण महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने मात्र याला जोरदार विरोध दर्शवला आहे. एकीकडे सरकार नॉन फार्मासिस्टला फार्मासिस्ट म्हणून मान्यता देण्याची घोषणा करतं आणि दुसरीकडे होलसेलसाठी फार्मासिस्ट बंधनकारक करतं. त्यामुळे सरकारची नेमकी भूमिका काय हाच आता प्रश्न आहे. तेव्हा सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी आणि योग्य तो अभ्यास करुनच कायद्यात दुरूस्ती कराव्यात असंही स्पष्ट केलं आहे. तर, या कायद्यासंदर्भातील आक्षेप लवकरच केंद्राकडे नोंदवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

Loading Comments