किर्ती व्यासचा मृतदेह कोल्ह्यांनी खाल्ला? शोध घेण्यासाठी ड्रोनचा वापर


किर्ती व्यासचा मृतदेह कोल्ह्यांनी खाल्ला? शोध घेण्यासाठी ड्रोनचा वापर
SHARES

किर्ती व्यास या तरुणीच्या हत्येचा उलघडा करण्यात गुन्हे शाखेला जरी यश आले असले, तरी किर्तीचा मृतदेह शोधण्यात पोलिस अपयशी ठरत आहेत. किर्तीची हत्या करून दीड महिना उलटला असून ज्या माहुल खाडीत तिचा मृतदेह टाकण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात होता, त्या भागातील कोल्ह्यांनी एव्हाना मृतदेह खाऊन टाकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे सिद्धेशवरील सर्व आरोप चुकीचे असल्याचा दावा सिद्धेशच्या नातलगांकडून करण्यात आला आहे.


माहुल खाडीत मृतदेहाचा शोध सुरू

किर्ती व्यासच्या हत्येनंतर १६ मार्च रोजीच सिद्धेश आणि खुशीने तिचा मृतदेह वडाळा येथील अँटॉप हिल जवळील खाडीत टाकल्याचे पुढे आले होते. किर्ती व्यासच्या हत्येचा उलगडा करताना पोलिसांनी आतापर्यंत ५०० हून अधिक सीसीटीव्ही तपासले आहे. तसेच, कलिनाच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या मदतीने रक्ताचा नमुना आणि केसांच्या मदतीने तांत्रिकीदृष्ट्या पुरावे सादर करून सिद्धेश आणि खुशीला अटक केली. मात्र, हत्येचा सबळ पुरावा पोलिसांना हवा असल्यामुळे किर्तीचा मृतदेह मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलिसांची चार पथके शनिवारपासून माहुल खाडी आणि पूर्वेला असलेल्या समुद्रात मृतदेहाचा शोध घेत आहेत.



भरतीचे सहा तास महत्त्वाचे

किर्ती व्यासचा मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांची चार पथके नेमण्यात आली आहेत. यामध्ये प्रॉपर्टी सेलचे अधिकारी, गुन्हे शाखा 4 आणि गुन्हे शाखा 2 च्या पथकातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या खाडी परिसरात मृतदेहाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी माहुल कोळीवाड्यातील कोळ्यांची मदत घेतली आहे. समुद्राची सहा तास भरती आहेत. त्यावेळी शोध घेतला जात आहे. मात्र, उर्वरित सहा तास आहोटीमुळे बोटी खाडीत उतरवणे धोकादायक असून बोट गाळात रुतून बसू शकते.



ड्रोनने शोधण्याचा प्रयत्न

आजू बाजूला असलेल्या तिवारांच्या झाडात जर मृतदेह अडकला असेल, तर तो भाग दलदलीचा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पोलिसांना जाता येत नाही आहे. तसेच कोल्ह्यांचीही भीती आहे. त्यामुळे पोलिसांनी ड्रोनच्या मदतीने मृतदेहाचा शोध घेण्याचे ठरवले आहे. बुधवारी दुपारपासून दोन ड्रोनच्या मदतीने मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे.


मृतदेह कोल्ह्यांनी खाल्ल्याचा संशय

माहुल समुद्रकिनारी असलेल्या तिवारांच्या झाडांमध्ये मोठ्या प्रमाणात कोल्हे आहेत. भक्ष्याच्या शोधात ते अनेकदा समुद्र किनारी येऊन कुत्र्यांवर हल्ले करत असतात. तसेच गावातील अल्पवयीन मूल दगावले की, ते समुद्र किनारी दफन केले जाते. त्यावेळी हे कोल्हे रात्रीच्या वेळी ते दफन केलेले मृत बाळही खाण्यासाठी घेऊन जातात. त्यामुळे 50 दिवसांपूर्वी खाडीत टाकलेला मृतदेह, एकतर पाण्यात वर तरंगताना मिळतो किंवा पाण्याच्या प्रवाहात तिवारांच्या झाडांमध्ये अडकतो. मृतदेह तिवारांच्या झाडांत अडकला असल्यास एव्हाना कोल्ह्यांनी तो खल्लाही असण्याची शक्यता पोलिस आणि पोलिसांना तपास कार्यात मदत करणारे स्थानिक कोळी पुंडलिक पाटील यांनी वर्तवली आहेत.


सिद्धेशच्या कुटुंबियांनी हत्येचे आरोप फेटाळले

"किर्ती व्यासच्या हत्येप्रकरणी सिद्धेश ताम्हणकरला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. मात्र, पोलिसांनी कोणताही ठोस पुरावा नसताना सिद्धेशला अटक केली आहे. सिद्धेश मागील चार वर्षांपासून त्या कंपनीत काम करत होता. आजपर्यंत कामावरून किंवा आजूबाजूच्या व्यक्तींशी त्याने कधी भांडण केले नाही. या गुन्ह्यात सुरवातीपासून तो पोलिसांना सहकार्य करत होता. पोलिस बोलवतील त्या दिवशी आणि त्या वेळी सिद्धेश भेटायला जायचा. 

एवढ्याशा छोटया गोष्टीसाठी सिद्धेश कुणाचा जीव घेणार नाही. घरात एकट्या कमवमाऱ्या मुलाला घरातील जबाबदाऱ्या कळतात. या गुन्ह्यात पोलिस त्याला वारंवार चौकशीला बोलवल्यानंतर घरातील सर्वच तणावाखाली आले होते. त्यावेळी सिद्धेश मी काही केले नाही. त्यामुळे माझं काही होणार नाही हे नेहमी सांगायचा. त्यामुळे पोलिसांनी जबरदस्ती सिद्धेशकडून गुन्ह्यांची कबूली घेतली", असल्याचा दावा सिद्धेश ताम्हणकरची बहिण सुचिता ताम्हणकर यांनी केला आहे.



हेही वाचा

किर्ती व्यासच्या हत्येप्रकरणी २ सहकाऱ्यांना अटक


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा