पोलीस अभिलेखावरील सराईत चोरटा जेरबंद

 Mumbai
पोलीस अभिलेखावरील सराईत चोरटा जेरबंद

वडाळा - पोलीस अभिलेखावरील सराईत चोरट्याला पकडण्यात वडाळा टीटी पोलिसांना यश आले आहे. सन्नी वाघमारे (20) असे त्याचे नाव असून तो कोकरी आगारचा रहिवाशी आहे. त्याला मंगळवारी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या चोरट्याने 27 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री कोकरी आगारात राहणाऱ्या शमसूद शेख यांच्या बंद घराचे टाळे तोडून सोन्याच्या दागिन्यांसह हजारोची रोकड लंपास केली होती. रात्री उशिरा घरी परतलेल्या शमसूदला घराचे टाळे तुटल्याचं पाहून घरातल्या सामानांची तपासणी केली असता घरफोडी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनतर त्यांनी तात्काळ वडाळा टीटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेची माहिती मिळताच वडाळा टी टी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कांबळे यांनी या विभागातील सर्व सराईत चोरट्यांना तात्काळ अटक करण्याचा आदेश गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश लिंगे यांना दिले.

पोलीस पथकाने पोलीस अभिलेखावर असलेल्याची चौकशी करण्यास सुरुवात केली त्यानुसार कोकरी आगार म्हाडा चाळीत राहणारा सन्नी वाघमारे याचे नाव पुढे आले. त्याचावर यापूर्वी 5 घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याने तो पोलिसांच्या रडारवर होता. त्यामुळे पोलिसांनी सन्नीच्या घरावर गुप्तपणे पाळत ठेवली होती. दरम्यान मंगळवारी पहाटे तो आपल्या घराशेजारी आला असता पोलिसांनी त्याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने म्हाडा चाळीत घरफोडी केल्याचे कबुल केले. त्यामुळे त्याच्यावर बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून सोन्याच्या दागिन्यांसह काही रोकड ताब्यात घेण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Loading Comments