डान्स बारवर कारवाई, पोलिस उपायुक्ताने लगावली सहकाऱ्याच्या कानशीलात

आपल्या विभागात न सांगता कारवाई केल्याच्या रागातून पोलिस उपायुक्त देशमाने यांनी पंचनामा करत असलेल्या पोलिस निरीक्षकाच्या थेट श्रीमुखात भडकवली.

डान्स बारवर कारवाई, पोलिस उपायुक्ताने लगावली सहकाऱ्याच्या कानशीलात
SHARES

एरवी एखादा गुन्हा घडल्यास तो आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो की दुसऱ्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो, यावरून वादावादी करणारे पोलिस अधिकारी हप्तेखोरी करताना मात्र आपल्या 'हद्दीत' कुणी घुसू नये, अशाच भूमिकेत वावरताना दिसतात. याच ताजं उदाहरण बुधवारी मालाडमध्ये घडलं. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका डान्स बारवर केलेल्या कारवाईमुळे संतापलेल्या पोलिस उपायुक्ताने कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याच्या श्रीमुखात भडकावल्याची घटना उघडकीस आली. यामुळे पोलिस दलात चर्चेला उधाण आलं आहे.


नेमकी घटना काय?

मालाडच्या एस.व्ही. रोडवरील अरूणा बारमध्ये रात्री उशिरपर्यंत बेकायदेशीररित्या डान्सबार सुरू असल्याची माहित गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा ११ चे पोलिस निरीक्षक आणि इतर पथकाने या डान्सबारवर कारवाई करत तिथून २४ तरूणींची सुटका केली. तर डान्सबारमधील कर्मचाऱ्यांसह १२ ग्राहकांना ताब्यात घेतलं.


आधी राग, मग सारवासारव

या कारवाईची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी स्थानिक झोन ११ चे पोलिस उपायुक्त विक्रम देशमाने यांना दिली. मात्र रात्री २ वाजता या कारवाईचा पंचनामा सुरू असताना देशमाने घटनास्थळी पोहोचले. आपल्या विभागात न सांगता कारवाई केल्याच्या रागातून देशमाने यांनी पंचनामा करत असलेल्या पोलिस निरीक्षकाच्या थेट श्रीमुखात भडकवली. परंतु थोड्याच वेळात आपली चूक लक्षात आल्यानंतर हे प्रकरण चिघळू नये म्हणून देशमाने सारवासारव करू लागले.


पोलिस दलात चर्चा

या घटनेमुळे आर्थिक हितसंबध जोपासण्यासाठी आतापर्यंत या बारवर पोलिसांकडून कारवाई केली जात नव्हती अशीही चर्चा रंगली आहे. या घटनेची बाहेर वाच्यता होऊ नये, यासाठी दक्षता घेत जात असली, तरी संपूर्ण पोलिस दलात दबक्या आवाजात याबाबत चर्चा सुरू आहे.


वरिष्ठांकडून पिळवणूक सुरूच

खरंतर गुन्हे शाखा आणि पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांमध्ये विविध प्रकारे खटके वारंवार उडत असतात. मात्र एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने आपल्या सहकाऱ्याला अशा प्रकारे थेट कानशीलात लगावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे वरिष्ठांकडून कनिष्ठांच्या होणाऱ्या पिळवणुकीचा प्रकार पून्हा एकदा उजेडात आल्याचं म्हटलं जात आहे. या घटनेची गंभीर दखल गुन्हे शाखेच्या सहआयुक्तांनी घेतली असून संपूर्ण प्रकारणाच्या चौकशीचे आदेश दिले असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा