बोरिवली - मौजमजा करण्यासाठी लागणारा पैसा मिळवण्यासाठी चोरी करणाऱ्या एका बंटी आणि बबलीला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केलीय. आरोपी आशिष आणि सोनाली हे दोघेही बोरीवली पूर्वेच्या कार्टर रोड क्रमांक 3 या परिसरात राहतात. यांच्यामध्ये आठ वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. आशिष हा अभियांत्रिकी शिक्षण घेतो, तर सोनाली खासगी कंपनीत नोकरी करते. शेजारी राहत असणाऱ्या व्यक्तीने यांच्यावर विश्वास दाखवून त्यांच्याकडे चाव्या ठेवतात. मात्र याच गोष्टीचा फायदा उठवत या दोघांनी चोऱ्या करण्यास सुरुवात केली. हा सर्व प्रकार उघड झाल्यानंतर कस्तुरबा मार्ग पोलीस स्टेशनमध्ये यांच्याविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या दोघांना अटक केली. आतापर्यत या दोघांनी तीन ठिकणी चोरी केल्याचं कबूल केलं असून पाच लाखाचं सोनं पोलिसांनी हस्तगत केलं. या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केले आहे.