राज्यातील सर्व पोलिस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही बसवणार- गृहमंत्री

एफआयआर घेण्यास टाळाटाळ करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई केली जाणार

राज्यातील सर्व पोलिस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही बसवणार- गृहमंत्री
SHARES

राज्यातील सर्व पोलिस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही बसवणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. येत्या तीन महिन्यांत हे काम पूर्ण होईल. यामुळे एफआयआर घेण्यास टाळाटाळ करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई केली जाणार असल्याचेही ते म्हणाले.


मुंबईत सध्या पाच हजार सीसीटीव्ही आहेत. यात आणखी पाच हजार सीसीटीव्हींची भर पडणार आहे. यासोबतच पुण्यातही सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. नव्या इमारतींनाही सीसीटीव्ही लावणे बंधनकारक असणार आहे. या इमारतींच्या सीसीटीव्हीचा एक कंट्रोल पोलिसांकडेही असेल अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली. यावेळी गृहमंत्र्यांनी नरेंद्र मेहता प्रकरणावर देखील भाष्य केले. संबंधित महिला तक्रार देणार असून त्यानंतर माजी आमदारांवर कडक कारवाई केली जाईल असे गृहमंत्री यावेळी म्हणाले.


या पूर्वी वडाळा येथील २६ वर्षांच्या तरुणाच्या कथित कोठडी मृत्यू प्रकरणाची दखल घ्या आणि कठोर कारवाई सुरू करण्याबाबत राज्य सरकारला आवश्यक ते आदेश द्या, अशी मागणी नव्याने उच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे. मात्र कोठडी मृत्यू रोखण्यासाठी पोलीस ठाण्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश पाच वर्षांपूर्वीच उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नव्हती. कोठडी मृत्यूप्रकरणी दाखल होणाऱ्या याचिका तसेच महाराष्ट्रात कोठडी मृत्यूंची संख्या वाढत असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालातून पुढे आलेले वास्तव याची दखल घेत न्यायालयाने राज्य सरकारला त्याबाबत ठोस उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते.


न्यायालय काय म्हणाले होते?

  • राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रत्येक खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवा. याशिवाय सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यांमध्ये टिपण्यात येणाऱ्या प्रत्येक हालचालींची नोंद ठेवावी आणि किमान वर्षभर त्या नोंदी निकाली काढू नयेत.

  • तसेच हे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित आहेत हे पाहण्याची जबाबदारी संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकावर असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.

  • एखाद्याला अटक केल्यानंतर लगेचच त्याच्या नातेवाईकांना त्याबाबत कळवण्यात यावे. आरोपीची सुरक्षा, त्याचे आरोग्य याची जबाबदारी अटक करणारा अधिकारी, तपास अधिकारी आणि स्टेशन हाऊस अधिकारी यांची असेल.

  • कोठडीत असलेला एखादा आरोपी जखमी आढळून आला, तर त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात येऊन त्याला चांगले उपचार मिळत आहेत की नाहीत याची काळजीही घ्यावी.

  •  एवढेच नव्हे, तर त्याला झालेल्या जखमांची छायाचित्रे काढावीत आणि कोठडीसाठी सादर करते वेळी आरोपीच्या शरीरावर जखमा आढळून आल्या तर महानगर दंडाधिकाऱ्याने ते लक्षात घेऊन कोठडी वाढवून देण्याबाबतचा आदेश द्यावा, असेही न्यायालयाने आदेश दिले होते.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा