प्रो कबड्डी खेळाडू निलेश शिंदेवर मारहाणीचा गुन्हा दाखल


SHARE

प्रो कबड्डीमार्फत कबड्डी प्रेमींच्या गळ्यातले ताइत बनलेला प्रसिद्ध खेळाडू निलेश शिंदे याने सहखेळाडू प्रताप शेट्टी यांनी प्रेक्षक सतीश सावंत यांना मारहाण केल्याप्रकरणी नेहरू नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कुर्ला पूर्वेकडील शिवाजी मैदानात मुंबई उपनगर जिल्हा निवड समिती कबड्डी असोसिएशनतर्फे सामने सुरू आहेत. तेव्हा भांडुप पश्चिमेकडील उत्कर्ष नगर कबड्डी संघाने या कबड्डी सामन्यात सहभाग घेतला होता. हे सामने पाहण्यासाठी प्रेक्षक म्हणून सतीश सावंत देखील उपस्थित होते. 


का केली मारहाण?

शनिवारी रात्रीच्या सुमारास संरक्षण प्रतिष्ठान संघ विरुद्ध स्वस्तिक कुर्ला संघ असा शेवटचा सामना सुरू होता. या सामन्यात प्रतिष्ठान संघाने स्वस्तिक कुर्ला संघाला पराभूत केले. 


यावेळी प्रेक्षक म्हणून उपस्थित असलेल्या सतीश सावंत यांनी संघाचे विजेत्या संघाचे अभिनंदन केले. तेव्हा शेजारीच उभ्या असलेल्या स्वस्तिक कुर्ला संघाचा खेळाडू निलेश शिंदे याचा राग अनावर झाला. त्यामुळे त्याने सतीश याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पुढे या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. निलेश याचे सहखेळाडू प्रताप शेट्टीने देखील सतीशला मारहाण करण्यास सुरुवात केली. रागाच्याभरात निलेशने काहीतरी टणक वस्तूने सतीशच्या डोक्यात मारले. त्यामुळे सतीश झखमी झाला. त्यावेळी तातडीने सतीशच्या सहकाऱ्यांनी त्याला राजावाडी रुग्णालयात नेले.


निलेशसह त्याच्या सहकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

उपचार केल्यानंतर सतीशने नेहरू नगर पोलीस ठाणे गाठत निलेश शिंदे आणि प्रताप शेट्टी यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला.

संबंधित विषय