भूपेंद्र वीरा हत्येप्रकरणी अमजदची कबुली


भूपेंद्र वीरा हत्येप्रकरणी अमजदची कबुली
SHARES

कालिना - माहिती अधिकार कार्यकर्ते भूपेंद्र वीरा यांच्या हत्येप्रकरणी माजी नगरसेवकाच्या मुलानंच हत्या केल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालंय. रझाक खान यांचा मुलगा अमजदनं पोलीस चौकशीत हत्येची कबुली दिलीय. भूपेंद्र वीरा यांची हत्या आपण केली असून, वडील रझाक खान यांचा या हत्येशी काहीही संबंध नाही, असं अमजदनं सांगितल्याचा दावा पोलिसांनी केलाय. 72 वर्षीय भूपेंद्र वीरा यांची रविवारी कालिन्यातील राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनंतर पोलिसांनी माजी नगरसेवक रझाक खान आणि त्यांचा धाकटा मुलगा अमजदला दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर झालेल्या चौकशीत अमजदनं ही धक्कादायक कबुली दिली. मात्र आपल्या पित्याच्या बचावासाठी अमजद हत्येचा आरोप आपल्यावर घेत आहे का, याचाही तपास केला जात आहे. हत्येच्या वेळी वीरा यांची पत्नी स्वयंपाकघरातच होती. ज्या बंदुकीतून गोळीबार झाला, तिला सायलेंसर लावण्यात आला नव्हता, मात्र टीव्हीच्या गोंगाटात एकच गोळी झाडल्यामुळे कोणालाच ती ऐकू न गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र ज्या बंदुकीतून वीरा यांच्यावर गोळीबार झाला, ती जप्त केल्याशिवाय अधिक माहिती देता येणार नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. पिता रझाक खान यांनी केलेली बांधकामं अनधिकृत असल्याच्या आरोपातून वीरा यांनी अनेक आरटीआय दाखल केल्या होत्या. त्याच रागातून मुलगा अमजदनं हत्या केल्याचंही म्हटलं जातंय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा