शाळकरी मुलांना भरधाव टेम्पोने उडवलं, एकीचा मृत्यू तिघे जखमी


शाळकरी मुलांना भरधाव टेम्पोने उडवलं, एकीचा मृत्यू तिघे जखमी
SHARES

भरधाव टेम्पोने शाळकरी मुलांना उडवल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी मालवणी परिसरात घडली. यात मुस्कान मेमन (१२) नावाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे, तर अन्य तिघे जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची स्थिती गंभीर असल्याचं समजतं. या अपघातानंतर टेम्पोचालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. मालवणी पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत.


मार्वे रोडवर झाला अपघात

मालवणीच्या गेटनंबर सात या परिसरात रहाणारे चौघे मंगळवारी शाळेला दांडी मारून मार्वेच्या दिशेने जात होते. हे चौघे मार्वे रोडवर टी जंकशनच्या जवळ पोचले तोच एक भरधाव टेम्पोने या चारही शाळकरी मुलांना उडवले. त्यानंतर एका रिक्षाला धडकून टेम्पो थेट झुडपात शिरला. असे सांगितलं जातं आहे की हा रस्ता उतार असल्याने वाहने भरधाव वेगाने जातात.


तीन भावंडे जखमी

या भीषण अपघातात मुस्कानचा जागीच मृत्यू झाला तर तिच्यासोबत असलेले नेहा मेवाती (१३), कमल मेवाती (१२) आणि भूपेंद्र मेवाती (९) ही तिन्ही भावंडे देखील जखमी झाली. यातील दोघांची स्थिती गंभीर असल्याचं समजतं. मुस्कान ही मालवणीतील खासगी शाळेत शिकत होती, तर मेवाती भावंडे ही जवळच्याच पालिका शाळेत शिकतात. या अपघातानंतर टेम्पो चालक फरार असून सध्या मालवणी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा