मासेमारीला मज्जाव केल्यानं पवईत सुरक्षा रक्षकाचा खून

  Powai
  मासेमारीला मज्जाव केल्यानं पवईत सुरक्षा रक्षकाचा खून
  मुंबई  -  

  पवई तलावात मासेमारी करण्यास रोखल्याने एका सुरक्षा रक्षकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शोएब खान असे मृत पावलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव असून, या प्रकरणी तबरेज उर्फ तब्बू दरवेज खान आणि सकिन अकबर हुसेन सिद्दीकी या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

  पवई तलावात मासेमारी करण्यावर पूर्णपणे बंदी आहे. मात्र तरीही काही गावगुंड हे अनधिकृतपणे जाळे लावून मासेमारी करतात. याच चोरीला रोखण्यासाठी महाराष्ट्र अँगलिंग असोसिएशन बोट क्लब यांनी 1 एप्रिलपासून मून सिक्युरिटी एजन्सीला सुरक्षेचे कंत्राट दिले होते. या एजन्सीमध्ये शोएब खान हे सुपरवायझर म्हणून काम करत होते.

  सोमवारी रात्री तलावात माशांची चोरी होऊ नये म्हणून शोएब आणि त्यांचे तीन साथीदार गस्त घालत असताना तबरेज उर्फ तब्बू दरवेज खान आणि सकिन अकबर हुसेन सिद्दीकी हे दोघे अचानक बोटीवर आले आणि शोएबसह त्यांच्या साथीदारांना धमकवायला लागले.

  तबरेज हा नेहमीच तलावातून मासे चोरी करायचा. त्याने लावलेली जाळी काढू नये म्हणून तो धमकाऊ लागला. शोएब यांनी मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे भडकलेल्या तबरेजने धारधार शस्त्राने शोएब यांच्यावर वार केले आणि त्यांना तलावात फेकून दिले. यानंतर या दोघांनी धस्तावलेल्या इतर 3 सुरक्षा रक्षकांना किनाऱ्यावर आणून सोडले आणि मागे काही पुरावा राहू नये या उद्देशाने पुन्हा बोट तलावात नेली आणि तिथेच बुडवली.

  तबरेज आणि त्याचा साथीदार सकिन सिद्दीकी हे दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. त्यांनी याआधी देखील पवई तलावाच्या सुरक्षारक्षकाला मारहाण केली होती. त्यामुळे त्यांना तलाव क्षेत्रात जाण्यास पवई पोलिसांनी बंदी घातली होती. असं असतानाही हे दोघे तलाव क्षेत्रात जाऊन मासे पकडण्यासाठी गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 'या प्रकरणी आम्ही दोघा आरोपींना हत्या तसेच पुरावा नष्ट करण्याच्या आरोपाखाली अटक केल्याची माहिती पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाई महाडेश्वर यांनी दिली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.