सेट टॉप बॉक्सच्या नावाखाली लुटले साडे चार लाख!

केबल ऑपरेटरच्या वेशात आलेल्या चोराने ७७ वर्षीय गोपाळ फाटक यांच्या घरातून साडेचार लाखांचा ऐवज पळवला आहे.

सेट टॉप बॉक्सच्या नावाखाली लुटले साडे चार लाख!
SHARES

चोर हे चोऱ्या करण्यासाठी नवनवीन मार्गांच्या शोधात असतात. कधी ते पोलिस बनून लोकांना गंडवतात, तर कधी हातचलाखीने चोऱ्या करतात. असाच एक प्रकार मुंबईच्या घाटकोपरमध्ये समोर आला असून केबल ऑपरेटरच्या वेशात आलेल्या चोराने ७७ वर्षीय गोपाळ फाटक यांच्या घरातून साडेचार लाखांचा ऐवज पळवला आहे.


दोन नवीन चॅनेल पडले साडेचार लाखात!

पंतनगरच्या 'अरुणवैद्य गार्डन'मध्ये राहणारे ७७ वर्षीय गोपाळ फाटक शनिवारी एकटेच होते. दुपारी साडे बाराला अचानक बेल वाजली. त्यांनी दरवाजा उघडला, तर एक अनोळखी इसम दारात उभा दिसला. आपण 'स्पेस विजय डिजिटल नेटवर्क'मधून आलो असून, दोन नवीन चॅनेल वाढवण्यासाठी आल्याचं त्याने गोपाळ फाटक यांना सांगितलं.


हातात सेट टॉप बॉक्स आणि घरात चोरी!

घरी येताच त्याने सेट टॉप बॉक्सला आर्थिंग नसल्याने शॉक लागत असल्याचा बहाणा केला. गोपाळ फाटक यांना सेट-टॉप बॉक्सच्या पाठिमागे धरून ठेवण्यास सांगितले आणि संधी साधून बेडरूममध्ये गेला, तिथे कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम आपल्या ताब्यात घेतली. परत बाहेर आला आणि थातुर-मातुर कारण देत घरातून लगबगीने निघून गेला. जोपर्यंत गोपाळ फाटक यांना चोरी झाल्याचं समजलं, तोपर्यंत बराच उशीर झाला होता.


४२० चा गुन्हा दाखल

या चोरट्याने फाटकांच्या घरातून ४ लाख ३५ हजारांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली असून या प्रकरणी पंतनगर पोलिस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध ४२० (फसवणूक) आणि ४१९ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पंतनगर पोलिसांनी दिली आहे.



हेही वाचा

सँडहर्स्ट रोड स्टेशनजवळ धावत्या लोकलमधून फेकल्याने प्रवाशाचा मृत्यू


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा