धारावीत राष्ट्रवादीच्या वयोवृद्ध कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

 Dharavi
धारावीत राष्ट्रवादीच्या वयोवृद्ध कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला
Dharavi, Mumbai  -  

धारावी पश्चिमेच्या डोंबरखाना विभागातील म्हाडा ग्राऊंड परिसरात राष्ट्रवादीच्या वयोवृद्ध कार्यकर्त्यांवर अज्ञात इसमाने देशी कट्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी घडली. या हल्ल्यात हाजी मुस्तकीम शेख (60) जबर जखमी झाले असून, त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच धारावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व परिस्थितीचे अवलोकन करत परिसरात चोख बंदोबस्त ठेवला.

हाजी मुस्तकीम शेख रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या कारखान्याकडे जात असताना म्हाडा ग्राऊंड परिसरात दडून बसलेल्या एका अज्ञात हल्लेखोराने देशी कट्याने त्यांच्यावर जवळून तीन वेळा फायर केले. मात्र देशी कट्ट्यातून एकही राऊंड फायर न झाल्याने संतापलेल्या माथेफिरू हल्लेखोराने त्यांना पकडून त्यांच्या डोक्यात सलग तीन ते चारवेळा देशी कट्याच्या पोलादी मुठीने जोरदार हल्ला करून त्यांना जखमी केले. आरडाओरड झाल्याचे पाहताच हल्लेखोराने घटनास्थळावरून पोबारा केला. त्यांना गॅरेजचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी रक्तबंबाळ अवस्थेत तत्काळ शीव रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून समजले.

हाजी मुस्तकीम शेख एक जेष्ठ समाजसेवक म्हणून धारावीत विभागात लोकप्रिय असल्याने त्यांच्यावर देशी कट्याने गोळीबार झाल्याची बातमी धारावीत वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे शेकडो मुस्लिम अबालवृद्धांनी शीव रुग्णालयात एकच गर्दी केल्याचे दिसून आले. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीपूर्वी हाजी मुस्तकीम शेख यांनी काँग्रेसला रामराम ठोकून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे या हल्ल्यामागे राजकीय षड्यंत्र असावे, अशी चर्चा येथील स्थनिकांमध्ये रंगली होती. याप्रकरणी धारावी पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध जीवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत बांगर अधिक तपास करीत आहेत.

Loading Comments