व्यापाऱ्याला किडनॅप करणाऱ्या 'या' सहा आरोपींना अटक


व्यापाऱ्याला किडनॅप करणाऱ्या 'या' सहा आरोपींना अटक
SHARES

मुंबईच्या अंबोली परिसरातून व्यावसायिकाचे अपहरण करून त्याच्याच मोबाईलवरून कुटुंबीयांना व्हिडिओ क्लिप पाठवून खंडणी मागणाऱ्या सहा जणांना आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी अंबोली पोलिसांनी व्यावसायिकाची देखील सुखरूप सुटका केली आहे.
31 ऑक्टोबरला भाविन शहा (39) नावाचे व्यावसायिक आपल्या टँकरचा परवाना मिळवण्यासाठी अंधेरी आरटीओत गेले होते. मात्र मध्य रात्र उलटल्यानंतरही न परतल्याने त्यांच्या घरच्यांची चिंता वाढली. त्यांचा मोबाईल फोनदेखील बंद होता. चिंताग्रस्त असलेल्या त्यांच्या कुटुंबियांनी भाविन यांचा बेपत्ता होण्याची तक्रार देखील अंबोली पोलीस ठाण्यात नोंदवली होती. भाविन यांचा शोध सुरू असताना एका फोनने भाविनच्या पत्नीची झोप उडवली.


काय होते 'त्या' क्लिपमध्ये?

फोन पाठोपाठ एक व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ क्लिप देखील त्यांच्या पत्नीला पाठवण्यात आली. ही क्लिप बाघताच भाविन कुठे आहेत? ते स्पष्ट झाले. क्लिपमध्ये घाबरलेल्या भाविन यांनी गुजरातीमध्ये त्यांचे वडील आणि पत्नी यांना उद्देशून 'अपहरणकर्त्यांनी मला बंदिस्त करून ठेवले असून त्यांना ८२ लाख रुपये हवे आहेत. त्याकरता काही वाट्टेल ते करा. हे फार वाईट लोक आहेत. त्यांची मागणी पूर्ण करा, अन्यथा हे मला मारून टाकतील', असे सांगत होते. क्लिप समोर येताच पोलीस खडबडून जागे झाले. आंबोली पोलीस ठाण्यात अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू झाला.



त्यानंतर आंबोली पोलीस ठाण्यात असलेले एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. सुरुवातील आरोपींचा शोध लावणे पोलिसांना देखील अवघड जात होते. पण शेवटी खंडणीची रक्कम घेताना पोलिसांनी संधी साधली. अंधेरी ते नालासोपारा या मार्गावरील चालत्या लोकल ट्रेनमधून अनेक वेळा प्लॅटफॉर्म बदलून गर्दीच्या वेळेत दिवस-रात्र तपास करून खंडणीची रक्कम घेण्यासाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या माहितीवरून नालासोपारा येथून भाविन यांची सुखरूप सुटका केली.
यावेळी पोलिसांनी अपहरणकर्त्यांकडून एक देशी कट्टा, तीन काडतुसे, चाकू, मोबाईल फोन आदी साहित्य जप्त केले. अटक आरोपींना न्यायालयाने १३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा