लोकलवर दगड मारल्याने गार्ड जखमी

  Masjid Bandar
  लोकलवर दगड मारल्याने गार्ड जखमी
  मुंबई  -  

  मस्जिद बंदर स्थानकानजीक बुधवारी सायंकाळी अज्ञान व्यक्तीने सीएसटी - पनवेल लोकलवर दगड फेकून मारल्याने लोकलचा गार्ड जखमी झाल्याची घटना घडली आहे. फिरोज रफिक शेख (50) असे या गार्डचे नाव आहे. शेख सीएसटी हेडकॉटर्स येथे राहतात.

  सीएसटीहून पनवेलकडे निघालेल्या सायंकाळी 7.34 वाजेच्या लोकलमध्ये शेख आपले कर्तव्य बजावत होते. या लोकलने मस्जिद बंदर स्थानक सोडताच लोकलच्या पूर्व बाजूकडून अज्ञात व्यक्तीने लोकलवर दगड मारला. हा दगड थेट शेख यांच्या डाव्या डोळ्याच्या भुवईवर लागला. त्यांचा डोळा थोडक्यात बचावला असला, तरी शेख या घटनेत गंभीर जखमी झाले. परंतु पुढील स्थानकात तात्काळ बदली गार्ड उपलब्ध नसल्याने शेख यांना जखमी अवस्थेत वडाळा रोड स्थानकापर्यंत आपले कर्तव्य बजावावे लागले. वडाळा स्थानकात लोकल थांबवून गार्ड बदली झाल्यानंतर ही लोकल रवाना करण्यात आली.

  शेख यांच्यावर वडाळा लोहमार्ग पोलिसांनी प्रथमोचार करून त्यांना पुढील उपचारासाठी तत्काळ भायखळा येथील रेल्वेच्या रुग्णालयात दाखल केले. तर या घटनेचा सीएसटी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. परंतु दगडफेकीच्या या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.