वडाळ्यात टॅक्सी चालकावर जीवघेणा हल्ला

 wadala
वडाळ्यात टॅक्सी चालकावर जीवघेणा हल्ला
wadala, Mumbai  -  

टॅक्सीचालकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना वडाळा (पू.) येथील शांतीनगरमध्ये मंगळवारी पहाटे घडली. या हल्ल्यात टॅक्सीचालक समीर कुमार यादव (28) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी राजेश यादव (40) नावाच्या तरुणाला वडाळा टीटी पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

शांतीनगर झोपडपट्टीत राहणारा टॅक्सीचालक मंगळवारी पहाटे नेहमीप्रमाणे आपल्या धंद्यावर जाण्यासाठी निघाला होता. त्यावेळी रस्त्यात कोणी नसल्याचे पाहून राजेश यादवने अंधाराचा फायदा घेत पाठीमागून समीरकुमारच्या डोक्यावर लाकडाने जोरदार हल्ला करत त्याला मारहाण केली. त्यावेळी समीर रक्तबंबाळ झालेला पाहून राजेशने घटनास्थळावरून पळ काढला. पहाटेच्या वेळी झालेला गोंधळ ऐकून शेजारीच राहणाऱ्या नातेवाईकांनी समीरला तात्काळ शीव रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर वडाळा टीटी पोलिसात तक्रार दाखल केली असता कर्तव्यावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक दीपक साळुंके यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन आरोपीला पकडले. त्याची कसून चौकशी केली असता पूर्ववैमनस्यातून हा हल्ला केल्याचे आरोपीने कबूल केले. याप्रकरणी राजेश यादववर जीवाशी मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading Comments