२०१९ मध्ये गुन्हेगारीतील या घटनांनी वेधलं लक्ष

२०२० वर्ष येत आहे, म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. सरतं २०१९ हे वर्ष अनेक चांगल्या-वाईट संमिश्र घटनांनी भरलेलं आहे.

२०१९ मध्ये गुन्हेगारीतील या घटनांनी वेधलं लक्ष
SHARES

२०२० वर्ष येत आहे, म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. सरतं २०१९ हे वर्ष अनेक चांगल्या-वाईट संमिश्र घटनांनी भरलेलं आहे. मात्र, नवीन वर्षातही या घटनांचं प्रतिबिंब उमटणार आहे. असे बरेच मुद्दे आहेत जे वर्ष संपल्यानंतरही संपणार नाहीत. २०१९ मधील अशाच काही घटनांवर नजर टाकूया. 


पीएमसी घोटाळा

मुंबईसह महाराष्ट्रात २०१९ पीएमसी घोटाळ्यामुळे कायमच धगधगत राहिले. रातोरात बँकांना ताळे ठोकल्यानंतर खातेदारांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. अखेर आरबीआयने या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर नागरिकांना त्यांचे पैसे टप्या टप्याने परत मिळू लागले.  तरी हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर आणि पैसे बुडाल्याचे कळाल्यानंतर ९ जणांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेने (पीएमसी) बांधकाम क्षेत्रातील हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) या कंपनीला २००८ ते २०१९ या कालावधीत नियमबाह्यपणे कर्ज दिले. कर्जांची परतफेड होत नसतानाही ती खाती आरबीआयपासून लपवत बनावट अभिलेख तयार करून ती माहिती रिझर्व्ह बँकेला सादर केली. दिवाळखोरीत गेलेल्या एचडीआयएलला पीएमसीने तब्बल ६५०० कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. त्यामुळे बँकेला ४३५५.४६ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती बँकेचे माजी व्यवस्थापक संचालक जॉय थॉमस याने पोलिसांना कबूली दिली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १२ जणांना अटक केली असून आर्थिक गुन्हेशाखेच्या पोलिसांनी आरोपींच्या कोट्यावरधी रुपयांच्या मालमत्तेवर ही टाच आणली आहे.


नायर पायल तडवी आत्महत्या प्रकरण

मुंबईच्या नायर रुग्णालयातील वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या पायल तडवीच्या आत्महत्येने एकच खळबळ उडवून दिली. २२ मे रोजी वरिष्ठ डाँक्टरांच्या जाचाला कंटाळून पायलने तिच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. वरिष्ठ डाँक्टरांकडून कायम चुकीची वागणूक मिळणे, जातीवाचक शिवीगाळ आणि हिनवण्यामुळे पायलने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते. तिच्या आत्महत्येला तिने डाँ हेमा अहुजा, भक्ती मेहरा, अंकिता खंडेलवाल  यांना जबाबदार धरले. या आत्महत्येनंतर पोलिसांनी डाँ. हेमा अहुजा, भक्ती मेहरा, अंकिता खंडेलवाल यांना अटक केली. पायलच्या आत्महत्येनंतर वरिष्ठ डाँक्टरांकडून हाँस्टेलमध्ये चालणाऱ्या रॅगिगचा प्रकारावर आणि रुग्णालय प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले गेले. सध्या या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहेत.  


वडाळा टीटी कस्टेडिअल डेथ

क्षुल्लक कारणांवरून झालेला वाद विकोपाला जातो आणि त्यातून टोकाची भूमिका घेतली जाते, असाच काहीसा प्रकार वडाळा टीटी येथे पहायला मिळाला. ट्रकटर्मिनल येथे अंधारात उभे असलेल्या प्रेमीयुगलांवर विजयसिंह याच्या गाडीची लाईट पडली. त्यातून प्रेमीयुगल आणि विजयसिंह यांच्यातील वाद विकोपाला गेला शाब्दीक वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. मात्र वेळीच पोलिसांची गस्त घालणारी गाडी त्या ठिकाणी आली आणि प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत आले. खाकीचा दाख पाहिल्यानंतर  नुकतेच लग्न ठरलेल्या विजयसिंह मानसिक तणावात गेला. त्यातून त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला झटका आला आणि तो पोलिसांच्या तुरूंगातच कोसळला. रुपचाराकरता त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आणि प्रकरण चिघळले. त्यावेळी पोलिसांवर ही निष्काळजी पणाचा ठपका ठेवण्यात आला. विजयसिंहच्या मृत्यूनंतर संतापलेल्या स्थानिकांनी पोलिसांविरोधात धरणे आंदोलन केले. टप्याटप्याने या प्रकरणात पोलिसांची चूक समोर येऊ लागली. या घटनेचे राजकिय पुढाऱ्यांनी ही राजकारण करत त्याचे पडसाद विधीमंडळात उमटले. अखेर पोलिस आयुक्तांनी या प्रकरणात पाच पोलिसांनी निलंबित केल्यानंतर प्रकरण शांत झाले.

केईएम बालकाचा मृत्यू

 प्रिन्सला जन्मजात हृदयरोग व अरुंद श्वास नलिकेचा त्रास तसेच न्यूमोनिया हे गंभीर आजार होते. उत्तर प्रदेश राज्यातील महू जिल्ह्यातून अडीच महिन्यांच्या प्रिन्सला त्याच्या वडिलांनी त्याला उपचारासाठी मुंबईला आणले होते. प्रिन्सवर परळच्या के.ई.एम रुग्णालयात उपचार सुरू होते.  त्याची प्रकृती नाजूक असल्यामुळे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना.  व्हेंटीलेटरवरमध्ये शॉर्टसर्किट झाले. या दुर्घटनेत प्रिन्सचा हात आणि एका बाजूचा चेहरा भाजला गंभीररित्या भाजला.  या घटनेनंतर के.ई.एम रुग्णालयाचा निष्काळजी पणावर सर्वच स्तरावरून आगपाखड होऊ लागली. या प्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात प्रिन्सच्या वडिलांनी गुन्हा दाखल केला.  त्यानंतर प्रिन्सला बरे करण्यासाठी के.ई.एममधील डाँक्टरांनी शर्तीचे प्रयत्न सुरू केले. या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी पालिकेने ही प्रिन्सच्या कुटुंबियांना पाच लाखाची तोकडी मदत जाहिर केली. या सर्व घडामोडी सुरू असतानाच एक वाईट बातमी आली.  प्रिन्सच्या हाताला संसर्ग झाल्यामुळे रक्ताभिसरणाला अडथळे निर्माण होऊ लागले. त्यामुळे त्याचा हात काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, त्याचा हात शस्त्रक्रिया करुन काढला. त्यामुळे या दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. मात्र दोन आठवडा मृत्यूशी झुंज देणाऱ्या प्रिन्सला न्यूमोनिया व सेप्टिमियामुळं झाल्यामुळे त्याची प्रकृती बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला. पालिकेच्या रुग्णालयाचा ढिसाळपणा हा काही नवा नाही.

 

राज्य सहकारी बँक घोटाळा

 सिंचन घोटाळा, राज्य सहकारी बँक घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळ्याकडे लक्ष वेधत सत्तेवर आलेल्या भाजपने विरोधकांना खिंडीत पकडण्याचा विडाच उचलला. त्यापैकीच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (MSC) कथित हजारो कोटी रुपयांच्या घोटाळा २०१९ मध्ये लक्षवेधी ठरला. या घोटाळ्यात राज्यातील मोठ मोठ्या नेत्यांची नावे पुढे येऊ लागली. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (MSC) कर्ज वितरण घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे यांच्यासह इतर ५३ नेत्यांवर एमआरए पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला.महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही राज्याची शिखर बँक म्हणून ओळख जाते. या बँकेने केलेल्या २५ हजार कोटी रुपयांच्या कर्जवाटपात अनियमितता झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने या बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करत याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणी नाबार्ड, सहकार व साखर आयुक्त, कॅग इत्यादींचे अहवाल असूनही एफआयआर नोंदवण्यात आला नाही, असा आरोप करत माहिती अधिकार कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी एफआयआर नोंदवण्याचे आदेश देण्याची विनंती फौजदारी जनहित याचिकेद्वारे केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने पुढील ५ दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश दिले. या प्रकरणात शेवटी राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांचे नाव आल्याने प्रकरण आणखीनच चिघळले.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा