राज्यातील ३८ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

११ अधिकाऱ्यांना पदोन्नतीसह एकूण ३८ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस उपमहानिरीक्षक अशा पदांवरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

राज्यातील ३८ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
SHARES

राज्यातील पोलीस दलातील ३८ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या सोमवारी करण्यात आल्या.  मुंबई, ठाणे, पुणे, नागरपुरसह अनेक ठिकाणच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृह विभागाच्यावतीने रात्री उशिरा जारी करण्यात आले.

११ अधिकाऱ्यांना पदोन्नतीसह एकूण ३८ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस उपमहानिरीक्षक अशा पदांवरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 

अतिरिक्त पोलिस महासंचालक रितेश कुमार यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे (सीआयडी) येथे प्रमुख म्हणून बदली करण्यात आली आहे तर, सीआयडीचे प्रमुख असलेले अतुलचंद्र कुलकर्णी यांची राज्य कारागृहाचे (सुधारसेवा) प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. 

पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे यांची ठाणे येथे गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे. तर, दक्षिण विभागचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय शिंदे यांची पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अतिरिक्त आयुक्त आर. बी. डहाळे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

नाशिकमधील महाराष्ट्र पोलीस अकादमी संचालकपदी असलेल्या अस्वती दोरजे यांची नागपूर शहरात सहपोलीस आयुक्त म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागेवर राजेश कुमार मोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर छेरिंग दोरजे हे नागपूर परिक्षेत्राचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदलून येणार असून, आतापर्यंत या पदावर असलेले चिरंजीव प्रसाद यांची राज्य राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त महासंचालक म्हणून मुंबईला बदली झाली आहे.

पिंपरी चिंचवड येथील उपायुक्त सुधीर हिरेमठ यांची पदोन्नतीने गुन्हे अन्वेषण विभागात उपमहानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. तसेच, पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे यांची पश्चिम विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा