Advertisement

रेल्वेची तिजोरी कॅशिअरनेच लुटली

कर्मचाऱ्यांकडे अंतर्गत चौकशी सुरू केली. त्यावेळी समीर सांगत असलेल्या माहितीत असंख्य विसंगती दिसत होत्या. पोलिसांनी खाकीचा धाक दाखवल्यानंतर समीरने गुन्ह्यांची कबूली दिली.

रेल्वेची तिजोरी कॅशिअरनेच लुटली
SHARES
कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनसवरील तिकिट घरातून २२ सप्टेंबरच्या रात्री तब्बल ४४ लाखांची रोकड चोरीला गेल्याची घटना घडली. ही रोकड त्या ठिकाणच्या रेल्वेच्या दोन कॅशिअरनेच बनावट चावीच्या मदतीने चोरल्याची धक्कादायक बाब पोलिस चौकशीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी समीर ताहराबादकर आणि कुमार पिल्ले या दोघांना अटक केली आहे.


सीसीटिव्ही कॅमेरे नाहीत

कुर्लाच्या लोकमान्य टिळक टर्मिनलवर तक्रारदार सुनील तेलतुंबडे हे चीफ बुकिंग सुपरवायझर म्हणून काम पाहतात.  दीड वर्षापासून ते कुर्ला टिळक टर्मिनलवर कार्यरत आहेत. चोरी झालेल्या ठिकाणाची जबाबदारी ही मुख्य बुकिंग सुपरवायझर  एस. के. चौधरी यांच्यावर होती. मात्र ते १६ सप्टेंबरपासून ते सुट्टीवर गेल्याने तेलतुबंडे हे प्रभारी म्हणून काम संभाळत होते. दिवसभर तीन ड्युटींमध्ये जमा झालेली कॅश तिजोरीत ठेवली जायची. तिजोरीच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे नाहीत.


 आरोपी रेल्वेचे कॅशिअरच

२२ सप्टेंबर रोजी पहिल्या सत्रात विनोद पिल्ले यांच्या निदर्शनाखाली सहा अधिकारी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत कार्यरत होते. त्यानंतर समीर ताहराबादकर यांच्या निदर्शनाखाली सजित नायर, रतिश झा, हरिशचंद्र, झम्मन मिना, पंकजकुमार सिंग हे कर्मचारी कार्यरत होत. या टिमची ड्युटी राञी १२ वा. संपल्यानंतर रात्री हेच सहा जण तिसऱ्या शिफ्टसाठी पुढे कार्यरत होते. त्यामुळे तिजोरीच्या चाव्या या ताहराबादकर यांच्याकडेच होत्या. दरम्यान २३ सप्टेंबरच्या राञी झम्मन या दिवसातील रक्कम तिजोरीत ठेवण्यासाठी गेल्या असता तिजोरीतून सर्व कॅश चोरीला गेली असल्याचे निदर्शनास आले. झन्नत यांनी  २ वा.च्या सुमारात तेलतुंबडे यांना चोरीच्या घटनेची माहिती दिली. तिजोरीतून तब्बल ४४ लाख २९ हजार ५०१ रुपये चोरीला गेले होते. या चोरीची माहिती मिळताच कुर्ला रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

बनावट चावीद्वारे चोरी

घटनास्थळी सीसीटिव्ही नसल्यामुळे आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना असंख्य अडचणी येत होत्या. त्यानंतर पोलिसांनी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडे अंतर्गत चौकशी सुरू केली. त्यावेळी समीर सांगत असलेल्या माहितीत आणि घडलेल्या घटनेत असंख्य विसंगती दिसत होती. पोलिसांनी खाकीचा धाक दाखवल्यानंतर  समीरने गुन्ह्यांची कबूली दिली. मात्र ही चोरी त्यांनी का केली आणि चोरीची रक्कम त्या दोघांनी कुठे ठेवली आहे याबाबत ते अद्याप मौन बाळगून आहेत. न्यायालयाने दोघांना २८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
संबंधित विषय
Advertisement