कुख्यात गुंड रवि पुजारीला सेनेगलमध्ये अटक, भारतात प्रत्यार्पण करण्याची शक्यता

रवी पुजारीला भारतात आणण्याचे सर्व कागदपत्रं पूर्ण झाल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

कुख्यात गुंड रवि पुजारीला सेनेगलमध्ये अटक, भारतात प्रत्यार्पण करण्याची शक्यता
SHARES

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला पुन्हा एकदा सेनेगलमध्ये अटक करण्यात आली आहे. गुन्हेगार प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कर्नाटक पोलिसांची एक विशेष टीम सेनेगलमध्ये आहे. त्याशिवाय त्यांच्या मदतीसाठी भारतीय गुप्तचर यंत्रणा ‘रॉ’ चे अधिकारीही त्यांच्यासोबत असल्याचे सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला भारतीय तपास यंत्रणांच्या मदतीने पश्चिम आफ्रिकेच्या सेनेगल इथे अटक करण्यात आली आहे. सध्या रॉचे अधिकारी आणि कर्नाटक पोलीस सेनेगलमध्ये हजर आहेत आणि अधिकारी त्यांच्या प्रत्यार्पणाची तयारी करत आहेत. जेव्हा रवी पुजारी शेवटचा पळाला होता तेव्हा तो सेनेगल येथून पळून गेल्याची माहिची समोर येत आहे.

रवी पुजारीला भारतात आणण्याचे सर्व कागदपत्रं पूर्ण झाल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. आज रविवारी त्याला भारतात आणण्यात येईल. जेव्हा रवी पुजारीला भारतात आणलं जाईल तेव्हा तो कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात राहिल. मिळालेल्या माहितीनुसार, अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी अँटोनी फर्नांडिसच्या नावाने पासपोर्ट बनवून सेनेगलमध्ये राहत होता. हा पासपोर्ट 10 जुलै 2013 रोजी जारी करण्यात आला होता, जो 8 जुलै 2023 पर्यंत वैध आहे. पासपोर्टनुसार, तो एक व्यावसायिक एजंट आहे. याचा अर्थ असा की, तो एक व्यावसायिक म्हणून ओळखला जातो. जो सेनेगल, बुर्किना फासो आणि त्याच्या आसपासच्या देशांमध्ये 'नमस्ते इंडिया' नावाच्या रेस्टॉरंट्स चालवितो. भारतीय गुप्तचर संस्था रॉ सध्या रवी पुजारीला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

जून 2019 मध्ये झाला होता फरार

गेल्या वर्षी जूनमध्ये सेनेगल कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी फरार झाला होता. त्याला 21 जानेवारी 2019 रोजी सेनेगल येथे भारतीय एजन्सीच्या इनपुटवरून अटक करण्यात आली होती. रवी पुजारी हा आफ्रिकी देशात सेनेगलमध्ये राहत होता. भारतीय एजन्सी सतत त्याच्यावर नजर ठेवत होती. आता त्याला भारतात आणण्याची तयारी सुरू आहे.

रवी पुजारीवर कर्नाटक-महाराष्ट्रात 98 प्रकरणं

रवी पुजारीने बॉलिवूड स्टार आणि अगदी गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनाही हद्दपार करण्याची धमकी दिली होती. त्याच्याविरूद्ध कर्नाटक आणि मुंबई इथे 98 खटले प्रलंबित आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये गुजरातचे आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणींनी अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीने जीवे मारण्याची धमकी दिल्याची पोलीस तक्रार दिली होती.

जिग्नेश म्हणाले होते की, त्यांना फोन कॉल्स आणि मेसेज करून धमकवण्यात आलं होतं आणि धमकी देणारा रवी पुजारी असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. जिग्नेश यांना फोन करणाऱ्या व्यक्तीने दावा केला होता की त्याचं नाव रवी पुजारी आहे आणि तो ऑस्ट्रेलियामध्ये आहे. त्याने म्हटलं होतं की मेवाणींना गोळी मारू शकतो.

रवि पुजारीवर 43 गंभीर गुन्ह्यांची नोंद

रवी पुजारीवर अनेक राज्यांमध्ये खंडणी तसंच हत्येचे गुन्हे दाखल आहेत. महिन्याच्या सुरुवातीला मुंबई पोलिसांनी रवी पुजारीचे दोन हस्तक . विलिअम रॉड्रिक्स आणि आकाश शेट्टी यांना अटक केली. या दोघांच्या चौकशीतून रवी अफ्रिकेत लपल्याचे पुढे आल्यानंतर इंटरपोलच्या मदतीने त्याला अटक केल्याचे बोलले जातं. मुंबईत रविवर सर्वाधिक 43 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या गुन्ह्यांमध्ये काही महत्वाचे सेलिब्रिटींची ही नोंद आहे. हे गुन्हे रविच्या प्रत्यार्पणासाठी महत्वाचे ठरू शकतात.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा