शरीरसुख नाकारल्याने काकाने केली ११ वर्षीय पुतण्याची हत्या


SHARE

वर्सोव्यातील खारफुटीत मृत अवस्थेत सापडलेल्या ११ वर्षीय मुलाची हत्या त्याच्या काकाने केल्याचं समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखा कक्ष ९ ने रवी वाघेला (४२) नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. या नराधम काकाने आपल्या पुतण्यावर शारीरिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पुतण्याने प्रतिकार केल्यांनतर काकाने त्याची हत्या केल्याचं गुन्हे शाखेने सांगितलं.


काय आहे प्रकरण?

जुहूच्या इर्ला परिसरात राहाणारा ऋषी वाघेला २२ नाेव्हेंबरला घरातून अचानक बेपत्ता झाला. त्याच्या कुटुंबाने त्याला शोधण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र शेवटपर्यंत ऋषी सापडलाच नाही. शेवटी जुहू पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी वर्सोव्यातील पंच मार्ग परिसरात वर्सोवा पोलिसांना एका लहान मुलाचा मृतदेह सापडला. हा मृतदेह ऋषी कुटुंबाला दाखवल्यावर त्यांनी तो आपल्याच मुलाचा असल्याचं सांगितलं होतं.


'असा' संशय बळावला

मृतदेह शवविच्छेदनासाठी अंधेरीच्या कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला. मात्र त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण डॉक्टरांनी सांगितलं नव्हतं. घटनास्थळी ऋषीचा शर्ट त्याच्या मृतदेहाच्या शेजारी पडल्याने पोलिसांचा शारीरिक अत्याचाराचा संशय बळावला होता.


खबऱ्याची पक्की माहिती

या प्रकरणाचा समांतर तपास करत असलेल्या गुन्हे शाखा ९ ला त्यांच्या खबऱ्याने ऋषीच्या मृत्यूनंतर त्याच्या काकाच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याची माहिती दिली. त्यानंतर गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी केल्यावर त्याने ऋषीची गळा दाबून हत्या केल्याचं मान्य केलं.


कबुतर पकडून देतो सांगून नेलं

रवी वाघेलाने गुन्हे शाखेला दिलेल्या माहितीनुसार ऋषीवर शारीरिक अत्याचार करण्यासाठी त्याने त्याला वर्सोव्याला नेलं. मुलाला कबुतर खूप आवडत असल्याने त्याला कबुतर पकडून देण्याचं आमिष या नराधमाने दाखवलं. तिथे रवीचा भंगाराचा व्यवसाय असून ओसाड जागेचा फायदा घेत ऋषीवर शारीरिक आत्याचार करण्याचा प्रयत्न रवीने केला. मात्र ऋषीने त्याला नकार दिल्याने त्याने त्याची गळा दाबून हत्या केली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या