ताडदेवमध्ये पोलिसाच्याच घरी चोरी

 Tardeo
ताडदेवमध्ये पोलिसाच्याच घरी चोरी
ताडदेवमध्ये पोलिसाच्याच घरी चोरी
See all

ताडदेव - पोलीस शिपायाच्या पत्नीला बाथरूममध्ये डांबून चार लाखांच्या ऐवजावर डल्ला मारणार्‍या महिलेला ताडदेव पोलिसांनी सोमवारी अटक केली. प्रियंका उतेकर असं या महिला चोराचं नाव आहे. चोर आणि चोरी झालेल्या श्वेता नार्वेकर या महिलेचे पतीही मलबार हिल पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. ‘क्राइम पेट्रोल’ ही मालिका पाहूनच चोरीची आयडिया सुचल्याचं प्रियंकानं चौकशीत सांगितलंय.

श्‍वेता नार्वेकर ताडदेव पोलीस वसाहतीत राहतात. त्यांच्याच शेजारच्या इमारतीत प्रियंका राहते. श्‍वेता घरात काय करते, कुठे मौल्यवान वस्तू ठेवते हे सगळं प्रियंकाला माहिती होतं. श्‍वेताच्या पतीचं नावही माहीत असल्यानं प्रियंका तिच्या घरी गेली. तिनं पतीचं नाव सांगितल्यामुळे श्‍वेतानं तिला घरात घेतलं आणि ती पाणी आणायला आत गेली. प्रियंकानं श्‍वेताला बाथरूममध्ये ढकलून बाहेरून दरवाजा बंद करून घेतला आणि घरातले दागिने तसंच इतर मौल्यवान वस्तू असा सुमारे चार लाखांचा ऐवज घेऊन ती पसार झाली. पती घरी परतताच श्‍वेताने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला. छोट्या-छोट्या चोरीच्या प्रकारांमुळे प्रियंका पोलीस वसाहतीत चर्चेत होतीच. त्यातच श्‍वेतानं सांगितलेले वर्णन मिळतं-जुळतं असल्यामुळे पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. उडवाउडवीची उत्तरं देणार्‍या प्रियंकानं नंतर मात्र गुन्ह्याची कबुली दिली.

Loading Comments