Advertisement

अकरावी सीईटीसाठी १२ लाख विद्यार्थ्यांचे अर्ज

राज्य शासनाने यंदा अकरावीच्या प्रवेशांसाठी सीईटी घेण्याचा निर्णय घेतला आहे. 21 ऑगस्टला ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे.

अकरावी सीईटीसाठी १२ लाख विद्यार्थ्यांचे अर्ज
SHARES

अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी 12 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. सीईटीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ द्यावी, अशी कोणाचीही मागणी राज्य मंडळाकडे आलेली नाही. त्यामुळे आता नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात येणार नसल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली आहे.

राज्य शासनाने यंदा अकरावीच्या प्रवेशांसाठी सीईटी घेण्याचा निर्णय घेतला आहे. 21 ऑगस्टला ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. राज्य मंडळाने सीईटीच्या नोंदणीसाठी 20 जुलैपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली. मात्र संकेतस्थळाला तांत्रिक अडचणी येऊ लागल्याने  अर्ज प्रक्रिया 21 जुलैपासून काही दिवसांसाठी बंद ठेवून पुन्हा सुरू करण्यात आली. अर्ज भरण्यासाठीची मुदत 3 ऑगस्टला संपली.

सीईटीसाठी 11 लाख 90 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. काही विद्यार्थ्यांनी शुल्क भरल्याची नोंद  संगणकीय प्रणालीत होणे बाकी आहे. त्यामुळे राज्यभरातून  12 लाख विद्यार्थी ही सीईटी देतील असा अंदाज आहे.

मुंबई विभागातून सर्वाधिक अडीच लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचे समोर आले आहे. कोरोनामुळे सुरक्षित वातावरणात विद्यार्थ्यांची ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचे राज्य मंडळाचे नियोजन आहे. सुरक्षित  अंतराचे नियम पाळून एका परीक्षा केंद्रावर साधारण 300 विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळील परीक्षा केंद्र देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा