Advertisement

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या, सवलतीच्या गुणांसाठी मोजा 'इतके' शुल्क

सकारात्मक विचार करुन आणि विद्यार्थी हित लक्षात घेऊन हे शुल्क कमी करण्यात आलं आहे.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या, सवलतीच्या गुणांसाठी मोजा 'इतके' शुल्क
SHARES

दहावी (SSC) आणि बारावी (HSC) बोर्ड परीक्षेत सवलतीच्या गुणांसाठी 50 रुपयांऐवजी आता 25 रुपये शुल्क मोजावे लागणार आहेत. या वर्षीपासून दहावी आणि बारावी परीक्षेत सवलतीच्या अतिरिक्त गुणांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त 50 रुपये आकारले जातील असं माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलं होतं.

परंतु विद्यार्थी, पालक तसंच शिक्षक संघटना आणि इतर काही संघटनांनी त्याला विरोध दर्शवत राज्य शिक्षण मंडळाकडे शुल्क कमी करण्याची मागणी केली होती. त्यावर सकारात्मक विचार करुन आणि विद्यार्थी हित लक्षात घेऊन हे शुल्क कमी करण्यात आलं आहे.

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या आणि लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या तसेच खेळाडू, एनसीसी, स्काऊट व गाईड विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्यात येतात.

निकालाचा टक्का वाढवण्यास हातभार लावत असल्याने विद्यार्थ्यांसाठी हे गुण महत्त्वाचे असतात. त्यामुळे विद्यार्थी सवलतीच्या अतिरिक्त गुणांसाठी शाळा, शिक्षणाधिकारी किंवा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव दाखल करतात.

परंतु सवलतीच्या अतिरिक्त गुणांचा लाभ घेण्यासाठी फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेपासून प्रति विद्यार्थी 50 रुपये छाननी शुल्क हे शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडून प्रस्ताव सादर करत असताना चलनाद्वारे किंवा रोख रक्कम भरणा म्हणून विभागीय मंडळ स्तरावर घेण्यात येत होतं.

शिक्षणाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांमार्फत सवलतीच्या अतिरिक्त गुणांचे प्रस्ताव शाळा तसंच विभागीय शिक्षण मंडळाकडे येत असतात. या सर्व प्रस्तावांची छाननी करावी लागते. त्यानंतर त्यात काही त्रुटी आढळल्यास संबंधितांशी पत्रव्यवहार करुन त्रुटींची पूर्तता करावी लागते. त्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर रोजंदारी कर्मचारी नेमावे लागतात. या कामासाठी लागणारा वेळ, श्रम याचा विचार करुन 50 रुपये छाननी शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला.



हेही वाचा

ट्रान्सफर सर्टिफिकेटशिवाय शाळांमध्ये प्रवेश मिळणार : दीपक केसरकर

2021-22 या शैक्षणिक वर्षाची 15% शालेय फी परत करण्याचे आदेश

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा