Advertisement

१ली ते १२वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आधार क्रमांक नोंदणी अनिवार्य

या सवलत योजनांमधील गैरव्यवहार टाळण्यासाठी विद्यार्थ्यांची आधार क्रमांक नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे.

१ली ते १२वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आधार क्रमांक नोंदणी अनिवार्य
SHARES

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना विविध सवलत देण्यात येतात. या सवलत योजनांमधील गैरव्यवहार टाळण्यासाठी विद्यार्थ्यांची आधार क्रमांक नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यानुसार, सर्व माध्यमांच्या शाळांमधील १ली ते १२वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आधार क्रमांक नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. राज्यात १ लाख १० हजार ३१५ शाळांमध्ये सुमारे २ कोटी २५ लाख ६० हजार ५७८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

राज्य शासनाच्यावतीनं पोषण आहार, राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान, मोफत गणवेश, पाठ्यपुस्तक व इतर आनुषंगिक योजनांचा विद्यार्थ्यांना लाभ दिला जातो. या योजनांचे लाभ गरजू व पात्र विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजेत, अशी शासनाची भूमिका आहे. पुढील ६ महिन्यांत, म्हणजे ३१ मार्च २०२१ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने शासकीय, खासगी अनुदानित, विनाअनुदानित अशा सर्व शाळांना दिले आहेत. लाभार्थी विद्यार्थ्यांची अचूक माहिती उपलब्ध नसेल तर, त्यात गैरप्रकार होण्याची शक्यता आहे. त्याला आळा घालण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या ‘सरल’ या संकेतस्थळावर सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंदवणे आवश्यक आहे.

याआधी ही प्रक्रिया सुरू केली असली तरी, अद्याप ६४ लाख ५९ हजार ३८८ विद्यार्थ्यांची नोंदणी प्रलंबित आहे. काही विद्यार्थ्यांची दुबार नोंदणी झाली आहे, तर अस्तित्वात नसलेल्या काही विद्यार्थ्यांच्याही नोंदी झाल्याचे समोर आले आहे. असे प्रकार टाळण्यासाठी आधार क्रमांक नोंदणी अद्ययावत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना साथरोगाच्या प्रादुर्भावामुळे सध्या सर्व शाळा बंद आहेत. शाळा सुरू होईपर्यंत आधार नोंदणी करू नये, असे ठरविण्यात आले होते. मात्र आता ही नोंदणी तहसील कार्यालय, बँका व टपाल कार्यालयांमधून करून घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आलं आहे.

ज्या विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक आहेत त्यांच्या हाताच्या अंगठ्याचा ठसा घेऊन बायोमेट्रिकद्वारे आधार नोंदणी अद्ययावत करून घ्यायची आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे आधार क्रमांक नाही, त्यांची नव्याने नोंदणी करणे आवश्यक आहे. ६ महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही प्रक्रिया पार पाडत असताना कोरोना संसर्गाचे भान ठेवून गर्दी होणार नाही यादृष्टीने नियोजन करणे, सुरक्षित अंतर राखण्याबरोबरच नोंदणी केंद्राचे र्निजतुकीकरण करणे, मुखपट्टीचा वापर इत्यादी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना सर्व शाळा व विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा