SHARE

मुंबई, ठाण्यासह राज्यभरातील आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना आता फाडफाड इंग्रजी बोलण्याचे वेध लागले आहेत. यामागचं कारण म्हणजे या विद्यार्थ्यांना उत्तम इंग्रजी बोलता यावं म्हणून आदिवासी विकास विभागाने 'मॅजिक इंग्लिश एफएसएल' हा उपक्रम हाती घेतला आहे. मुंबई, ठाण्यातील ९० हून अधिक आश्रमशाळांचा यांत समावेश आहे.


उपक्रम कशासाठी?

इंग्रजी भाषेअभावी विद्यार्थ्याला भविष्यात कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी 'मॅजिक इंग्लिश एफएसएल' शैक्षणिक उपक्रमाची सुरूवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी 'कराडी पाथ' या खाजगी शैक्षणिक संस्थेची मदत घेण्यात येत आहे.


कुणाच्या माध्यमातून?

'कराडी पाथ' ही संस्था या क्षेत्रात गेल्या १६ वर्षांपासून कार्यरत आहे. आकलन शक्ती आणि कार्यपद्धतीचा अनोखा मेळ घालत शिक्षणपद्धती विकसित करण्यात आली आहे. खेड्यापाड्यातील विद्यार्थी, शिक्षकांमधील इंग्रजीची आवड आणि त्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी 'मॅजिक इंग्लिश एफएसएल' हा उपक्रम तयार करण्यात आला आहे.


कुठे राबवणार उपक्रम?

सुरूवातीला हा उपक्रम २ वर्षांसाठी राबवण्यात येणार आहे. डहाणू, जव्हार, शहापूर आणि नंदूरबारमधील १३२ आदिवासी आश्रमशांळांची निवड करण्यात आली आहे. इयत्ता २ री ते इयत्ता ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सध्या प्रायोगित तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार असून, त्याचा मिळणारा प्रतिसाद पाहून त्याचा विस्तार वाढविण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास विभागातर्फे देण्यात आली. आदिवासी आश्रम शाळांमधील ५० हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना आणि ४०० पेक्षा अधिक शिक्षकांना या उपक्रमाचा फायदा होणार आहे.


विज्ञानासाठी 'एकलव्य' प्रकल्प

आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान या विषयाची आवड निर्माण करण्यासाठी महत्त्वाकांक्षी अशा 'एकलव्य' या उपक्रमाला सुरूवात करण्यात आली आहे. या उपक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा यांच्या हस्ते नुकतच करण्यात आलं.


सामंजस्य करार

आदिवासी विकास विभाग आणि एकलव्य फाऊंडेशन यांच्यात ३ वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्या अंतर्गत ४०० आश्रम शाळांची निवड करण्यात आली आहे. याचा फायदा राज्यातील १.३२ लाख विद्यार्थ्यांना होणार असल्याची माहिती आदिवासी विकास विभागातर्फे देण्यात आली. एकलव्य या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी निरनिराळ्या कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून शिक्षकांसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या