Advertisement

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये सीबीएसई बोर्ड

गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात अदयावत आणि दर्जेदार शिक्षण मिळावं, यासाठी महापालिकेतर्फे विविध प्रयोग केले जातात. त्याच पार्श्वभूमीवर येत्या २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून महापालिका प्रशासन सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरु करणार आहे.

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये सीबीएसई बोर्ड
SHARES

मुंबई महानगरपालिकेच्या शाळा म्हटलं की अनेक जणांची नाकं मुरडतात. झोपडपट्टीत राहणाऱ्या, घरकाम करणाऱ्या किंवा आर्थिक कुवत नसणाऱ्यांसाठी शासनानं केलेली शिक्षणाची सोय म्हणून त्याकडं बघितलं जातं. त्यामुळं मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय कुटुंब पालिकेच्या शाळांकडं कटाक्षानं दुर्लक्ष करतात.

शाळेतील शिक्षक, शिक्षणाचा दर्जा, शाळांची स्थिती, विद्यार्थ्यांवर होणारे संस्कार या सर्व बाबींमुळे अनेक पालक आपल्या मुलांना मोठमोठ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घालतात. अनेकांना या शाळांची फी देखील परवडत नाही. पण आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित व्हावं, इतकाच यामागे विचार असतो. या सर्व गोष्टी विचारात घेऊन मुंबई महापालिकेनं महापालिकेच्या १० शाळांमध्ये लवकरच सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात अदयावत आणि दर्जेदार शिक्षण मिळावं, यासाठी महापालिकेतर्फे विविध प्रयोग केले जातात. त्याच पार्श्वभूमीवर येत्या २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून महापालिका प्रशासन सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरु करणार आहे. या नव्या सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये ज्युनियर केजी (शिशुवर्ग), सिनीयर केजी (बालवर्ग) आणि १ली ते ६वीपर्यंतच्या प्रत्येक वर्गाची एक तुकडी असणार आहे. यानंतर टप्प्याटप्प्यानं हे वर्ग १०वीपर्यंतचे वाढवले जाणार आहेत.

महापालिका शाळा

महापालिका विभाग
शाळा
जी– उत्तर
भवानी शंकर रोड शाळा
एफ – उत्तर
काणे नगर मनपा शाळा
के – पश्चिम
प्रतीक्षा नगर मनपा शाळा
एल
तुंगा क्हिलेज, नवीन इमारत
एन
राजावाडी मनपा शाळा
एम – पूर्व 2 
अझीझ बाग मनपा शाळा
पी– उत्तर
दिंडोशी मनपा शाळा
पी – उत्तर
जनकल्याण नवीन इमारत
टी
 मीठागर शाळा, मुलुंड
एस
हरियाली क्हिलेज, मनपा शाळा, विक्रोळी

महापालिका का सुरू करणार सीबीएसई शाळा?

मुंबई महापालिकेतर्फे इयत्ता १ली ते १०वीपर्यंतच्या शाळा, कनिष्ठ विद्यालय आणि ४ वैद्यकीय महाविद्यालय चालवले जातात. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, यासाठी त्यांना २७ प्रकारच्या शैक्षणिक वस्तू मोफत दिल्या जातात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून अनेक पालकांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे कल वाढत आहे. त्यामुळं इतर माध्यमांच्या विद्यार्थी संख्येत घट होत आहे.

अनेकांना फी परवडत नसतानाही पालक विद्यार्थ्यांना सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या शाळांमध्ये घालतात. त्यामुळं मुंबई महापालिकेनं सीबीएसई मंडळाच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर गतवर्षी जोगेश्वरीतील पुनम नगर इथं प्रायोगिक तत्त्वावर एक सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू करण्यात आली. तर वरळीत आसीएसई बोर्डाची शाळा सुरु करण्यात आली आहे.

या प्रायोगिक तत्वांवर सुरु करण्यात आलेल्या २ शाळांपैकी सीबीएसई बोर्डाच्या शाळेला पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला. महापालिकेच्या सीबीएसई बोर्डाच्या एका शाळेसाठी तब्बल २ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज आले. पण यात फक्त ३०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. तसंच, या शाळांना महापालिकेच्या इतर शाळांप्रमाणे सुविधा देण्यात आल्या.

या शाळांना चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं इतर विभागात अशा प्रकारच्या शाळा सुरू केल्या जाव्यात, अशी मागणी येत होती. या मागणीनंतर महापालिकेनं सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला.

प्रवेश कधी?

येत्या २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून महापालिकेच्या सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये प्रवेश दिले जाणार आहेत. या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ८५ टक्के प्रवेश सोडत (लॉटरी) पद्धतीनं काढले जाणार आहे. ते विनाशुल्क असणार आहेत. तसंच, १० टक्के प्रवेश हे महापौरांच्या शिफारशीनुसार आणि ५ टक्के प्रवेश महापालिका कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.

मुंबई महापालिकेच्या इतर शाळांमधील विद्यार्थ्यांना ज्या सुविधा दिल्या जातात, त्या सर्व सुविधा या मुलांना दिल्या जाणार आहेत. यात छोटा शिशू वर्ग (ज्युनिअर के जी), मोठा शिशू वर्ग (सीनिअर के जी) व इयत्ता १ली ते ६वीपर्यंत प्रत्येक वर्गाची एक तुकडी सुरू केली जाणार आहे.

महापालिका शाळांचा कायापालट

एखाद्या खासगी शाळांप्रमाणे आकर्षक वाटण्यासाठी महापालिका शाळांची कायापालट केला जात आहे. काही ठिकाणी दुरुस्ती कामं, पुर्नबांधकाम, रंगरंगोटीची काम हाती घेण्यात आली आहेत. अनेक पालिका शाळांचा लूक यापूर्वीच चेंज करण्यात आला आहे. अनेक शाळांना बाहेरुन आकर्षक रंगरंगोटीही करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थी शाळेत जाण्यास कंटाळा करणार नाही, याच यामागचा उद्देश्य आहे.

शिक्षकांची पात्रता

या शाळेत शिकवणारे शिक्षकांचा निकष साधारण: समान असतो. त्यांची शैक्षणिक पात्रता सारखीच असते. फक्त सीबीएसईच्या अभ्याक्रमासाठी वेगवेगळे ट्रेनिंग घेतले जातात. यासाठी विविध शिक्षकांना काम करण्याची इच्छा आहे का? याबाबतचं मत मागवलं आहे. यात आतापर्यंत १०० शिक्षकांनी यात काम करण्यात आवडेल, असं सांगितलं आहे.

मागील काही वर्षांपासून महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत आहे. त्यामुळं आता महापालिका शाळांमध्ये सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम सुरु केल्यानंतर विद्यार्थी संख्येत वाढ होईल का? महापालिका शाळांमध्ये पालक आपल्या मुलाला प्रवेश देतील का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा