Advertisement

१०वी-१२वी नंतर काय? अशी करा कॉलेजची निवड!


१०वी-१२वी नंतर काय? अशी करा कॉलेजची निवड!
SHARES

दहावी-बारावीनंतर येणारी सुट्टी म्हणजे मुलांसाठी धमाल, मस्ती, आणि फुल टू एन्जॉयमेंट! पण या मोठ्या सुट्टीमध्ये सहल, मनोरंजन या बरोबरच पुढे कोणतं शिक्षण घ्यायचं, याबाबत विचार करणं गरजेचं आहे. शिवाय हा संपूर्ण विचार करताना आपल्याला ज्या क्षेत्रात प्रवेश घ्यायचा आहे, त्या क्षेत्रातला अभ्यासक्रम, त्याची एकंदर प्रवेश प्रक्रिया याबाबत माहिती असणे आवश्यक आहे.



सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉलेजांची योग्य पद्धतीने निवड करणं महत्त्वाचं आहे. गेल्या काही वर्षांत अनेक नवनवीन अभ्यासक्रम व कॉलेज सुरू झाल्याने आपण नेमका कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा? याबाबत पालक व विद्यार्थ्यांचा गोंधळ उडालेला दिसतो. अनेकदा शिक्षणाचा दर्जा, चकाचक इमारत, ए. सी. क्लासरूम, परदेशातील ट्रिप यावरून कॉलेज कधीच ठरवू नये. मग कॉलेज कसं निवडावं?


१. नॅक

नॅशनल असेसमेंट व अॅक्रेडिटेशन काऊन्सिलद्वारे प्रत्येक कॉलेज व विद्यापीठ याचं मूल्यांकन करून मानांकनं दिली जातात. http://www.naac.gov.in या शासनाच्या वेबसाईटवर नॅकचे मानांकन उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा कॉलेज निवडताना नॅकचे मानांकन पाहूनच कॉलेज निवडा.


२. नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिटेशन

इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, फार्मसी, आर्किटेक्चर तसंच हॉस्पिटॅलिटी अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थांतील शाखांचे मूल्यांकन करण्यासाठी ही संस्था काम करते. http://www.nbaind.org या वेबसाईटवर ही मानांकनं उपलब्ध आहेत.



३.  एआयसीटीइ

ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन अर्थात एआयसीटीई या नियामक मंडळाची स्थापना भारत सरकारद्वारे तांत्रिक शिक्षणाचा विकास, नियोजन व गुणवत्ता विकास व समन्वय साधण्यासाठी करण्यात आली. त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्थांकडून नियमांची व मानकांची अंमलबजावणी होते की नाही, याबाबत तपासणी केली जाते. एआयसीटीइद्वारे इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, फार्मसी अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी कॉलेजांना मान्यता दिली जाते. एआयसीटीइची मान्यता नसल्यास संस्था व अभ्यासक्रम बेकायदेशीर ठरवले जातात. एआयसीटीइच्या www.aicte-india.org या वेबसाइटवर मान्यताप्राप्त नसलेल्या संस्थांची यादी प्रकाशित केलेली आहे.


४. काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चर

ज्या विद्यार्थ्यांना आर्किटेक्चरला प्रवेश घ्यायचा असेल, त्यांना काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चर बाबत माहिती असणे आवश्यक आहे. भारतामध्ये पाच वर्षांचा आर्किटेक्चर पदवी अभ्यासक्रम चालवण्यासाठी काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चरची मान्यता असणं आवश्यक आहे. तसंच पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर व्यवसाय सुरु करण्यापूर्वी काऊन्सिलकडे नोंदणी करणं आवश्यक आहे. https://www.coa.gov.in ही काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चरची वेबसाईट आहे.



५. मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडिया

ही संस्था एमबीबीएस व त्यानंतरच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मान्यता देण्याचं काम करते. भारतात एमबीबीएस अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना संबंधित कॉलेजला एमसीआयची मान्यता आहे ना? याची खात्री करुन घ्यावी. परदेशातील अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यापूर्वी त्या देशातील वैद्यकीय अभ्यासक्रमांना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची मान्यता असणं आवश्यक आहे. त्या देशातील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या देशामध्ये वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी परवाना मिळणंही आवश्यक आहे. www.mciindia.org या वेबसाईटवर वैद्यकीय शिक्षणाबाबतची अन्य माहिती उपलब्ध आहे.


अन्य काही महत्त्वपूर्ण शाखा

मर्चंट नेव्हीतील नॉटिकल सायन्स, मरीन इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेण्यापूर्वी त्या संस्थेला डायरेक्टरेट जनरल ऑफ शिपिंगची मान्यता आहे का? हे तपासून घ्या.www.dgshipping.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला याबाबत सर्व माहिती मिळेल.



सध्या आयटीआयमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आयटीआयमध्ये प्रवेश घेण्यासाठी डायरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन व रिसर्चची मान्यता असणं आवश्यक आहे. http://www.dvet.gov.in या वेबसाईटवर आयटीआयच्या सर्व संस्थांची माहिती उपलब्ध आहे.

www.dgca.nic.in या वेबसाईटवर एव्हिएशनमध्ये एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग, पायलट ट्रेनिंग, फ्लाइट डिस्पॅचर याबाबत माहिती उपलब्ध आहे. तसेच, या संस्थांना डायरेक्टरेट जनरल सिव्हिल एव्हिएशनची मान्यता असणेही गरजेचे आहे.

बी.एड. अभ्यासक्रमांसाठी नॅशनल काऊन्सिल फॉर टीचर एज्युकेशनची मान्यता असलेल्या कॉलेजांची निवड करा. त्याबाबत http://www.ncte-india.org/ या वेबसाईटवर अन्य माहिती उपलब्ध आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा