क्रायच्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने, बालकांसाठी कृती करण्यासाठी लोकांना उत्तेजन देणे, ही या कार्यक्रमाची कल्पना आहे. या उपक्रमाच्या केंद्रस्थानी उत्साह व आनंद यांचे प्रतिक असणारा पिवळा रंग असून भारतातील सर्व बालकांना याचा अनुभव घेण्याची संधी मिळावी, असा आमचा प्रयत्न आहे.
- क्रेयान रबाडी, प्रादेशिक संचालक, क्राय
लहान मुलांवर करण्यात येणाऱ्या अत्याचाराची अनेक प्रकरणं समोर येत असताना मुंबईत लहान मुलांच्या आनंदासाठी एक अनोखा विक्रम रचण्यात आला आहे. येलो फेलोज असं या उपक्रमाचं नाव असून क्राय (चाइल्ड राइट्स अँड यू) या बालकांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या या सामाजिक संस्थेनं लहान मुलांच्या आनंदी बालपणाच्या हक्कासाठी एकता दर्शवण्याच्या हेतूने हा उपक्रम घेण्यात आला होता.
४१९ जण सहभागी
मुंबईतील सेंट झेवियर्स या महाविद्यालयात हा उपक्रम राबवण्यात आला असून या उपक्रमतर्गत उपस्थित असलेल्या अनेकांनी हातात सॉक-पपेट्स घालून या उपक्रमात सहभाग झाले होते. याआधी ३६३ जणांनी अशाप्रकारे हातात सॉक-पपेट्स घालून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. यंदाच्या वर्षी जवळपास ४१९ जण यात सहभागी झाले होते.
#YellowFellow
या उपक्रमांतर्गत अनेक लोकांनी येलो फेलोज बनून बालकांना पाठींबा देण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आलं. विशेष म्हणजे हे अभियान यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सोशल मीडियाचा देखील चांगल्या पद्धतीनं वापर करण्यात आला. या अभियानान शक्य तितक्या लोकांनी पिवळे मोजे घालून, #YellowFellow हे हॅशटॅग वापरून स्वतःचा फोटो सोशल मीडियावर टाकण्याचं आणि इतरांना सहभागी करण्यासाठी आपल्या इतर मित्रांना टॅग करण्याचं आवाहन करण्यात आलं.
उपक्रमाची गिनीज बुकात नोंद
या उपक्रमाच्या माध्यमातून सर्व क्षेत्रांतील व्यक्तींना एकत्र येण्याचं आवाहन होतं. या आव्हानाला सर्व मुंबईकरांनी उत्तम प्रतिसाद देत या अनोख्या उपक्रमाची गिनीज बुकात नोंद करण्यात आली आहे. याआधी २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड येथे अशा प्रकारच्या उपक्रमाची गिनीज बुकात नोंद करण्यात आली होती. या उपक्रमाद्वरे विविध उपक्रमांच्या माध्यमांतून बालकांबद्दल आणि त्यांच्या आनंदी बालपणाच्या हक्काबद्दल जनजागृती करण्यात आली.
संध्याकाळी, पाणी साठवण्याच्या टाक्या, कॅन, काठ्या, काचेच्या बाटल्या, धातूच्या कॅप अशा साहित्यापासून वाद्ये बनवून त्यातून संगीत निर्माण करणाऱ्या धारावी रॉक्स या झोपडपट्टीय मुलांनी तयार केलेल्या रॉक बँडने उत्कृष्ट परफॉर्मन्सही सादर केलं होतं.