बेस्ट ऑफ लक, बारावीच्या विद्यार्थ्यांचा आज पहिला पेपर


SHARE

राज्यात बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून म्हणजेच 21 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. यंदा राज्यातील 14 लाख 85 हजार 132 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. राज्यातील 2 हजार 822 केंद्रांवर परीक्षा होणार असून 9 हजार 486 महाविद्यालयातून नोंदणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना सकाळी 10.30 वाजता परीक्षा केंद्रावर येणं अनिवार्य असेल, अशी माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.


इतके विद्यार्थी देतील परीक्षा

  • विज्ञान शाखेचे 5 लाख 80 हजार 820,
  • कला शाखेचे 4 लाख 79 हजार 866
  • वाणिज्य शाखेचे 3 लाख 66 हजार 756 विद्यार्थी
  • व्यावसायिक अभ्यासक्रमाचे 57 हजार 693 विद्यार्थी परीक्षेला बसतील

परीक्षार्थींंमध्ये 8 लाख 34 हजार 134 विदयार्थी, तर 6 लाख 50 हजार 898 विद्यार्थिनींचा समावेश आहे.


पेपरफुटी रोखण्यासाठी

व्हॉट्सअॅपवरून पेपर फुटण्याचे प्रकार रोखण्यासाठी प्रश्नपत्रिकांचे सिलबंद पाकीट पर्यवेक्षकांनी परीक्षा केंद्रातील 2 विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेतल्यानंतरच उघडण्याचा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सअॅप पेपरफुटीला आळा घालण्यासाठी पेपरला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. गेल्या वर्षी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच व्हॉट्सअ‍ॅपवर फिरणाऱ्या प्रश्नपत्रिकेमुळे यंदा विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. यावेळी वर्गातच 10 वाजून 50 मिनिटाला प्रश्नपत्रिकांचे पाकीट उघडण्यात येणार आहे. उत्तरपत्रिका आणि पुरवण्या यांची अदलाबदल होऊ नये यासाठी सर्व उत्तरपत्रिका आणि पुरवण्यांवर प्रथमच बारकोडची छपाई करण्यात आलेली आहे.


काय आहेत नियम?

वेळेत न येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिलं जाणार नाही, याची प्रत्येक विद्यार्थ्याने खबरदारी घ्यावी, असं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे. सकाळी 11 ते दुपारी दोन आणि दुपारी 3 ते संध्याकाळी सहा अशी परीक्षेची वेळ असणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी वेळेआधीच परिक्षा केंद्रावर यावे. उशीर झाल्यास परीक्षेला बसू दिले जाणार नाही, अशी माहिती मंडळाचे मुंबई विभागाचे सचिव सुभाष बोरसे यांनी दिली.

परीक्षा केंद्रावर केंद्र संचालकांशिवाय कोणालाही मोबाइलचा वापर करता येणार नसून, मोबाइल जमा करावे लागतील. केंद्रापासून 100 मीटर अंतरावरील झेरॉक्स, टेलिफोन बुथ बंद राहणार असून नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई करणार असल्याचेही बोर्डाने सांगितलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षार्थींची संख्या कमी आहे आणि परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या